खेडच्या खारीपट्ट्यात रात्रंदिवस बिनधास्त चिऱ्यांची वाहतूक!

रॉयल्टी व वाहतूक परवानगीचा प्रश्न ऐरणीवर; महसूल विभागाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

खेड : तालुक्यातील खारीपट्टा परिसरात पावसाळ्यातही चिऱ्याने भरलेले डंपर रात्रंदिवस धावत असल्याने चिरे वाहतुकीच्या वैधतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खाणी बंद असताना आणि चिरे वाहतुकीसाठी आवश्यक रॉयल्टी अथवा परवानगीबाबत स्पष्टता नसतानाही बहिरोली– कोरेगाव– संगलट तसेच खेड–संगलट मार्गावर मोठ्या प्रमाणात डंपरची वाहतूक सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित वाहतूकदारांना अभय कुणाचे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

पावसाळ्यात खाणी बंद, मग चिरे येतात कुठून?

पावसाळ्यात खाणकामावर निर्बंध असताना मोठ्या प्रमाणात चिरे वाहतूक सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही व्यावसायिकांनी खाणीमधून चिरे काढून पूर्वीच साठवणूक केली असल्यास त्या साठ्यातील चिऱ्यांच्या वाहतुकीसाठी महसूल विभागाची आवश्यक रॉयल्टी व वाहतूक परवानगी घेतली आहे का, याची तपासणी होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एका डंपरमध्ये मोठ्या प्रमाणात चिरे भरून त्यांची वाहतूक केली जात असून, या चिऱ्यांची एका गाडीची किंमत सुमारे १८ ते २० हजार रुपये असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र या वाहतुकीमागील परवानग्या आणि रॉयल्टीची कागदपत्रे तपासली जात आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

तहसील कार्यालयासमोरूनही वाहतूक; कारवाई का नाही?

विशेष म्हणजे चिऱ्याने भरलेले डंपर खेड तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातूनही धावताना दिसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या नजरेसमोरूनच ही वाहतूक सुरू असेल तर त्यावर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नंबर प्लेट, लाईट नसलेल्या वाहनांमुळे धोका

खारीपट्टा परिसरातील अनेक रस्ते अरुंद असल्याने अवजड डंपरच्या वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही डंपरना नंबर प्लेट नसल्याचे, तसेच मागील सिग्नल लाईट तुटलेल्या अवस्थेत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. अशा वाहनांवर वाहतूक विभाग आणि महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लहान वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण

डंपरच्या वाहतुकीमुळे लहान वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. डंपर चालकांकडून अरेरावी केली जात असल्याचेही काही वाहनधारकांचे म्हणणे आहे. ‘आमचे वरपर्यंत हात आहेत, तुम्हाला काय करायचे ते करा,’ अशा प्रकारची भाषा काही चालकांकडून केली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या आरोपांची प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

‘त्या’ खाणी नेमक्या कोणत्या?

बहिरोली–कोरेगाव–संगलट मार्गावर सुरू असलेली चिरे वाहतूक नेमक्या कोणत्या खाणी अथवा साठवणूक केंद्रातून होत आहे, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे संबंधित डंपरची कागदपत्रे, रॉयल्टी पावत्या, वाहतूक परवाने आणि चिरे साठवणुकीची वैधता तपासण्यासाठी महसूल विभागाने तातडीने विशेष पथकाद्वारे तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

महसूल विभागाच्या भूमिकेकडे लक्ष

पावसाळ्यातील चिरे वाहतुकीसंदर्भातील नियम, रॉयल्टी, वाहतूक परवाने आणि वाहनांची वैधता यांची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता खारीपट्टा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button