
४७ अधिकारी बडतर्फ; नीट पेपरफुटीप्रकरणी ‘एनटीए’कडून बडगा, काहींवर फौजदारी कारवाईचा इशारा!!
नवी दिल्ली : पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलनाचे लोण पसरत असतानाच राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) शुक्रवारी मोठी कारवाई करत ४७ अधिकार्यांवर बडतर्फीची कारवाई केली. काही अधिकार्यांवर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे ‘एनटीए’कडून सांगण्यात आले.
केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची गुरुवारी रात्री पंचायत राज विभागात बदली करण्यात आली. त्यानंतर दुसर्याच दिवशी ‘एनटीए’ने अधिकार्यांवर कारवाईचा बडगा उगारला. ”एनटीएमध्ये आमूलाग्र बदल केले जाणार असून आणखी सुधारणावादी पावले उचलली जातील. किमान ४७ अधिकार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे आणि त्यापैकी काहींवर फौजदारी कारवाई केली जाईल,” असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचा रोष मोठ्या निदर्शनांच्या स्वरूपात बाहेर पडला. त्याचे लोण देशभर पसरले असून विविध ठिकाणी विद्यार्थी व तरुणांकडून आंदोलने करण्यात येत आहे. पेपरफुटी आणि ‘सीबीएसई’च्या डिजिटल मूल्यमापन प्रक्रियेतील त्रुटींमुळे निर्माण झालेल्या रोषामुळे वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. ‘एनटीए’ने त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी काही बदल करण्यावरही भर दिला आहे.
राजीनाम्यासाठी आजची मुदत
- नीट परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड होणार नाही, अशी अट कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) प्रतिनिधींनी केंद्र सरकारला घातल्यामुळे शुक्रवारी तोडगा निघू शकला नाही.
- प्रधानाच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने २४ तासांची मुदत मागितली असली तरी, प्रधानांना शिक्षण मंत्रालयातून हटवले जाणार नसल्याचे संकेत केंद्राने दिले आहेत.
- केंद्र सरकारने परीक्षा पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील विधेयक सोमवारी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाच्या मसुद्याला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.




