
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांची राज्यभरात आज ‘शाळा बंद’ आंदोलनाची हाक
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, गुरूवार दिनांक ९ जुलै २०२६ रोजी राज्यभरात ‘शाळा बंद’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने एकत्र येत या आंदोलनाचा निर्णय घेतला असून, उद्या सर्व शिक्षक सामूहिक रजेवर जाणार आहेत. त्यामुळे उद्या राज्यातील शाळांच्या कामकाजावर मोठा परिणाम होणार आहे, परिणाम शिक्षकच रजेवर असल्याने शाळा बंद राहणार आहेत.
गेल्या काही वर्षांत शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा ताण प्रचंड वाढला आहे. बीएलओ अर्थात बुथ लेव्हल ऑफिसरची ड्युटी, विविध शासकीय सर्वेक्षणांची कामे यांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे पुरेसा वेळ देता येत नाहीये. आम्हाला अशैक्षणिक कामे नकोत, आम्हाला फक्त शिकवू द्या! ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे. ही अशैक्षणिक कामे तात्काळ कमी करावीत, अशी आग्रही मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.




