
रत्नागिरी ग्रामदैवत श्रीदेव भैरीचा आषाढ पालखी उत्सव २४ जुलैपासून; २६ जुलैला पारंपरिक ‘बळ’ कार्यक्रम
रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ महिन्यातील पारंपरिक पालखी उत्सव व ‘बळ’ कार्यक्रम यंदाही धार्मिक उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पहिली ग्रामप्रदक्षिणा २४ जुलै, तर दुसरी ग्रामप्रदक्षिणा ८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.
दोन्ही दिवशी सकाळी १० वाजता श्रीदेव भैरीची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान करेल. पालखी खालची आळी, मुरलीधर मंदिर, काँग्रेस भवन, टिळक आळी, झाडगाव, जोशी पाळंद मार्गे परटवणे, फगरवठार, अठरा हाताच्या गणपती मंदिर, फाटक हायस्कूल-गाडीतळ, गोखले नाका, मारुती आळी, तेली आळी, पऱ्याची आळी, धमालनीचा पार, विठ्ठल मंदिर, मुरलीधर मंदिर मार्गे पुन्हा भैरी मंदिरात दाखल होईल. मार्गातील विविध ठिकाणी मानकऱ्यांच्या सहाण्यांवर पालखीचा पारंपरिक विधीनुसार मुक्काम होणार आहे. रात्री सुमारे १० वाजता पालखी भैरी मंदिरात परतल्यानंतर गाऱ्हाणे घालून ग्रामप्रदक्षिणेची सांगता होईल. तसेच २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता श्रीदेव भैरीचा पारंपरिक ‘बळ’ कार्यक्रम होणार आहे.
या सर्व धार्मिक उत्सवामध्ये बारा वाड्यांतील गावकरी, मानकरी, ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र (मुन्नाशेठ) सुर्वे यांनी केले आहे.




