
महेश ट्युटोरियल्सची 33 केंद्रे अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला!
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील नामांकित कोचिंग संस्था महेश ट्युटोरियल्सची 33 कोचिंग सेंटर्स अचानक बंद करण्यात आली आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयामुळे इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुलुंड शाखेपासून बंदची सुरुवात
महेश ट्युटोरियल्सच्या मुलुंड शाखेला अचानक कुलूप लावले गेले. त्यानंतर मुंबई आणि राज्यातील इतर शाखाही बंद करण्यात आल्याचे समोर आले. ऐन शैक्षणिक वर्षात घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांना अरिहंत अकॅडमीमध्ये प्रवेश
संस्थेने पालकांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होणार नाही असे म्हटले. याशिवाय विद्यार्थ्यांना अरिहंत अकॅडमीमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार¡ नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दिवाळखोरीच्या प्रक्रियेमुळे संकट
1988 मध्ये स्थापन झालेली महेश ट्युटोरियल्स ही महाराष्ट्रातील प्रतिष्ठित कोचिंग संस्थांपैकी एक मानली जात होती. मात्र, तिची मूळ कंपनी एमटी एज्युकेअर डिसेंबर 2022 पासून दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरी जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना ही संस्था सामना करत आहे. संस्थेवर सध्या सुमारे 32.33 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे.
पालकांची नाराजी, सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी
कोणतीही पूर्वकल्पना न देता क्लासेस बंद केल्यामुळे पालकांनी भरलेले शुल्क, अभ्यासक्रमाचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. विविध सामाजिक आणि धर्मादाय संस्थांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.




