
कोयनेच्या गाळात दडलाय प्राचीन इतिहास; ढोकरा शैलीतील दुर्मीळ गणेशमूर्ती मिळाली!
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाने यंदा तळ गाठल्यामुळे विस्थापित झालेली गावे आणि जुनी मंदिरे पुन्हा उघडी पडली आहेत. याचदरम्यान बामणोली-तापोळा परिसरातील कोरड्या पडलेल्या नदीपात्रात ‘ढोकरा’ शैलीतील एक अत्यंत दुर्मीळ, देखणी आणि सुबक गणेशमूर्ती आढळून आली आहे. ऋषी मुद्रेतील बैठ्या आसनावरील ब्रांझ धातूची ही मूर्ती सध्या इतिहास संशोधक आणि ग्रामस्थांमध्ये कमालीचा कुतूहलाचा विषय ठरली आहे.
कोयना धरणाच्या निर्मितीसाठी १९५८ मध्ये संपादन प्रक्रिया सुरू होऊन १९६३ मध्ये धरण पूर्ण झाले. यात जावळी, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातील सुमारे १०५ गावे विस्थापित झाली. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय आटला आणि हे विस्थापित वैभव समोर आले. ही मूर्ती कोणत्याही मंदिराच्या किंवा घराच्या अवशेषात नव्हे, तर थेट गाळाच्या मातीत सापडली आहे. अनेक वर्षे पाण्याच्या आणि गाळाच्या खाली राहूनही ही मूर्ती आजही सुरक्षित आणि सुस्थितीत आहे.
संशोधनाचे नवे कवाड
आदिवासी कला म्हणून ओळखली जाणारी ही शैली सह्याद्रीतील कृष्णा-कोयना खोऱ्यात आढळल्याने अभ्यासकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. ही मूर्ती स्थानिक पातळीवर घडवली गेली की ती बाहेरून आली, याचा उलगडा पुरातत्त्व विभागाच्या सखोल अभ्यासानंतरच होईल. या मूर्तीचे वैज्ञानिक परीक्षण झाल्यास महाराष्ट्राच्या प्राचीन सांस्कृतिक आणि व्यापारी वारशावर नवा प्रकाश पडू शकतो.
ढोकरा कलेला इतिहास काही हजार वर्षांपेक्षा जुना आहे. भारतातल्या अनेक आदिम जनजातींची ही नैसर्गिक कला परंपरा आहे. यामध्ये ‘लॉस्ट वॅक्स टेक्निक’ वापरून देवी देवतांच्या मूर्ती, बांगड्या, प्राणी तयार केले जातात. या कलेत ‘मोटीफ’चा उगम निसर्ग, श्रद्धा विषय, मिथक कथा, चालीरिती यात असतो. मोहेंजोदरो येथे सापडलेली, कमरेवर हात ठेवून उभी असलेल्या शालेय… इतिहासाच्या पुस्तकातली मूर्ती या ढोकरा कलेचेच प्रतीक आहे. – ॲड. सुमंतिनी नुलकर, वारसास्थळ अभ्यासक, सातारा
कोयना धरण पात्रामध्ये सापडलेली गणेशमूर्ती ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून, प्राचीन अशा ढोकरा कला शैलीमध्ये या मूर्तीची निर्मिती करण्यात आलेली आहे. काही अभ्यासकांच्या मते या मूर्तीचा कालखंड काही हजार वर्षे मागे जातो. कोयना परिसरात सापडलेली मूर्ती म्हणजे इतिहास अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि कलाप्रेमी मंडळींसाठी एक अनमोल ठेवा आहे. – आदित्य चौडे, इतिहास अभ्यासक आणि लेखक
काय आहे ‘ढोकरा शैली’?
ढोकरा ही भारतातील सर्वात प्राचीन, मेणाचा साचा वापरून धातू ओतकाम करण्याची पारंपरिक आदिवासी कला आहे. प्रामुख्याने छत्तीसगड, बस्तर, ओडिशा आणि झारखंड भागात हजारो वर्षांपूर्वी ही कला प्रसिद्ध होती. या शैलीतील मूर्ती आधी मेणापासून हाताने घडवली जाते, त्यावर मातीचा लेप देऊन ती भाजली जाते आणि मेण वितळवून त्या जागी द्रव धातू ओतून मूर्ती तयार केली जाते.




