स्वातंत्र्यदिनापूर्वी नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार; गणेशोत्सवासाठी अतिरिक्त उड्डाणांचाही विचार


मुंबई : कोकणाचा हवाई संपर्क अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे.

यासंदर्भात उद्योगमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला ‘फ्लाय-९१’ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. नवी मुंबई-चिपी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला.

या विमानसेवेच्या प्रारंभासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही मंत्री राणे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अतिरिक्त उड्डाणांची सुविधा उपलब्ध करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणाचा देशातील प्रमुख शहरांशी हवाई संपर्क अधिक सुलभ होणार आहे. यामुळे पर्यटन, व्यापार, उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असून कोकणाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button