
साखर सडे (राजापूर) येथे घरावर झाड कोसळून लाखोंचे नुकसान
राजापूर तालुक्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना
राजापूर : राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले. साखर सडे (चव्हाणवाडी) येथे जेष्ठ महिला श्रीमती पार्वती वसंत घडशी यांच्या घरावर दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मोठे जंगली झाड कोसळल्याने घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घरमालक उपचारासाठी बाहेरगावी गेले होते. त्याच दरम्यान झाड कोसळल्याने जीवितहानी टळली; मात्र भर पावसात घराचे मोठे नुकसान झाल्याने श्रीमती घडशी यांच्यावर संकट कोसळले आहे. संबंधित महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रविवारी काहीशी उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा जोर धरला असून संततधार पावसामुळे राजापूर शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळणे व भिंती ढासळण्याच्या घटना घडल्या आहेत. राजापूर शहरातील साखळकरवाडी येथे फणसाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने राजापूर–रानतळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. हेच झाड महावितरणच्या वीजवाहिन्यांवर पडल्याने काही वीज खांब कोसळले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच गोवळ (खालचीवाडी) महसूल गावात सेवानंद जोशी यांची संरक्षण भिंत कोसळली. विलये ग्रामपंचायत हद्दीत लवू पांडुरंग तावडे यांच्या घराशेजारी रस्त्यालगतची संरक्षण भिंत ढासळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. दोनिवडे ग्रामपंचायतीतील गवळीवाडी येथे प्रशांत दशरथ कविस्कर यांच्या घराशेजारील भिंतही कोसळली. मंगळवारी संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. सततच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात आणखी पडझडीच्या घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




