
राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; उकाडा कायम, हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : सकाळी मुसळधार पाऊस आणि दुपारी कडक ऊन, तर काही ठिकाणी सकाळी उन्हाचा तडाखा आणि दुपारनंतर जोरदार पावसाच्या सरी अशा विचित्र हवामानाचा अनुभव सध्या राज्यभरातील नागरिक घेत आहेत. पावसाची अधूनमधून हजेरी लागत असली तरी उकाड्याचा त्रास मात्र कमी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत हवामान विभागाने राज्यासाठी महत्त्वाचा अंदाज वर्तविला आहे.
प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या सुपर अल नीनोच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर हवामानाबाबत चिंता व्यक्त केली जात असताना, मान्सून केरळमध्ये दाखल होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने अनेक भागांत दमदार हजेरी लावली आहे.
अरबी समुद्रातून येणारे पश्चिमेकडील वारे मजबूत झाल्याने राज्यात विविध हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत. परिणामी मध्य महाराष्ट्र, तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली आल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोकण किनारपट्टीवर पावसाची चिन्हे
मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार दुपारनंतर ढगांची दाटी वाढून पावसाचा जोर वाढू शकतो. मात्र हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत पुढील ४८ तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रालाही दिलासा
पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो. उत्तर महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी ४५ अंशांच्या घरात गेलेले तापमान आता ४० अंशांच्या खाली आले आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस सर्वत्र एकाच वेळी होणार नसून काही गावांत मुसळधार पाऊस तर शेजारील भाग कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या नजरा मान्सूनकडे
सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपाचा असून खरीप हंगामातील शेतीकामांना गती देण्यासाठी मुख्य मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. पावसामुळे उष्णतेचा तडाखा काही प्रमाणात कमी होणार असला तरी आगामी दिवसांत मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे




