रस्ते, पूल खाल्ले; आता भाजपकडे रामालाही सोडायला तयार नाहीत – सतेज पाटील यांची कोल्हापुरात टीका!

कोल्हापूर : अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सामान्यांनी यथाशक्ती धन अर्पण केले. भाजपच्या छत्रछायेत असलेल्यांनी तेथे भ्रष्टाचार केल्याचे पैशाच्या गैरव्यवहार प्रकरणाने उघडकीस आले आहे.हे पाहता भाजपवाले रामाला सुद्धा सोडायला तयार नाहीत असे दिसून आले आहे, अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. अयोध्येतील श्रीराम मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे.

याविषयी विचारणा केली असता सतेज पाटील म्हणाले, राम मंदिराचे नियोजन करण्यासाठी भाजपच्या अधिपत्याखाली समिती कार्यरत आहे. तेथील पदाधिकाऱ्यांनी मंदिरात अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होत असल्याची घटना पुढे आली आहे. वाराणसी मध्ये मंदिर कॉरिडॉर बांधताना अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेले मंदिर पाडले होते. राम मंदिर उभारणीसाठी लोकांनी दिलेला पैसा हडपण्याचा प्रयत्न झाला आहे. रस्ते, पूल हे सत्ताधाऱ्यांनी आधीच खाल्ले. राम उरला होता. त्यावरही यांचा डोळा आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी भाजप मागे पुढे पाहत नाही हेच दिसून आले आहे, असेही ते म्हणाले.

विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी (एसआयआर ) काँग्रेससह महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांच्यावतीने सतर्क राहून काम केले जात आहे. या कामात प्रशासकीय पातळीवर गोंधळ दिसत आहे. लोकांमध्ये पुरेशी जागृती दिसत नाही. एका कोल्हापूर जिल्ह्यात सव्वा तीन लाखावर मतदारांचे नोंदणी (मॅपिंग ) झाले नसल्याचे दिसून आले आहे. हे काम प्रभावीपणे होण्यासाठी बीएलओच्या सोबतीला आणखी एक बीएलओ दिला पाहिजे. तसेच पावसाळा असल्याने हे काम होण्यात अडथळा येण्याची चिन्हे असल्याने सहा महिन्याची मुदतवाढ दिली पाहिजे. पुढील तीन वर्ष तरी निवडणुकांची कोणतीच घाई नाही. त्यामुळे हे काम शिस्तबद्ध झाले पाहिजे. त्यासाठी पुरेसा कालावधीही दिला पाहिजे, असेही सतेज पाटील म्हणाले.

दुबार नोंदणी शोधा

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात मतदारांची संख्या कमी झाली होती. असा प्रकार महाराष्ट्रात होऊ नये यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. दुबार मतदार नोंदणी टिपण्यासाठी निवडणूक आयोगाने एक प्रणाली ( सिस्टीम ) कार्यान्वित केली आहे. त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यंत्रणा कुचकामी

कोल्हापूर जिल्ह्यात एसआयआर नोंदणीसाठी मतदारांना बीएलओकडून निरोप जाणे गरजेचे असताना निम्म्याहून अधिक लोकांना असे निरोप पोहोचलेले नाहीत. या कामामध्ये अनेक त्रुटी असल्याचे महाविकास आघाडीच्या निदर्शनास आले आहे. यामुळे हे काम अधिक गंभीर्यपूर्वक होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

केरळ पॅटर्न राबवा

यावेळी माकपचे राज्य सचिव उदय नारकर यांनी केरळ राज्यात ही यंत्रणा कशा पद्धतीने राबवली याची माहिती दिली. केरळ प्रमाणे प्रभावीपणे एसआयआरचे काम झाले तर अकारण मतदारांची संख्या कमी होणार नाही. केरळात ९७ टक्के मतदारांचे नाव यादीत कायम राहिले याकडे त्यांनी लक्ष वेधले..यावेळी खासदार शाहू छत्रपती, ठाकरे शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख विजय देवणे, शेकापचे बाबासाहेब देवकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button