
चिखलगावच्या अपरिचित ‘कोंडी’ धबधब्यावर चिपळूणच्या निसर्गप्रेमींची अविस्मरणीय सफर
'आम्ही आबासाहेबांचे निसर्गप्रेमी' समूहाचा उपक्रम
चिपळूण :: नदी शेजारील डोंगररांगांच्या कड्यांवरून कोसळणाऱ्या जलधारा आणि धरणीच्या अंगावर पसरलेली हिरवी शाल अशा एका अपरिचित निसर्ग निर्मित चमत्काराचा अनुभव चिपळूणच्या निसर्गप्रेमींनी नुकताच घेतला. आजवर पर्यटकांच्या पडद्याआड दडलेल्या आणि उत्तुंग डोंगरांच्या तटबंदीने वेढलेल्या ‘कोंडी’ धबधब्याचा अनुभव भटक्यांनी घेतला. ‘आम्ही आबासाहेबांचे निसर्गप्रेमी’ समूहाच्या वतीने या भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते.

दापोली तालुक्यातील आडी-चिखलगाव हद्दीत चारही बाजूंनी डोंगर असलेल्या नदीपात्रात ‘कोंडी’ धबधबा कोसळतो. निसर्गप्रेमींनी भेट दिली तेव्हा, ‘नभ उतरले खाली’ अशा वातावरणात वरुणराजाने चिखलगावच्या परिसराला जणू नववधूचे रूप दिले होते. पावसाच्या चंचल सरी कोसळत असताना, हवेत एक मंद सुंगंध दरवळत होता. डोंगरांच्या रांगांनी या परिसराला आपल्या कवेत घेतले होते. जणू काही ते या गुप्त सौंदर्याचे रक्षणच करत होते. अशा या नयनरम्य वातावरणात निसर्गप्रेमींनी आपली पावले पुढे टाकली. एका डोंगराच्या काहीशा उतारावरून सारे नदीपात्राकडे उतरू लागले.

कानावर धबधब्याचा आवाज पडत होता. घनदाट झाडी आणि वळणावळणाच्या पायवाटा तुडवत जेव्हा हे निसर्गदूत धबधब्यापाशी पोहोचले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी जणू डोंगराचे अश्रू नसून आनंदाचे उमाळे होते. दगडांवरून वाहताना पाण्याचा जो ‘झुळझुळ’ नाद ऐकू येत होता, तो एखाद्या स्वर्गीय संगीतासारखा वाटत होता. मानवी कोलाहलापासून दूर, हा धबधबा केवळ निसर्गाशी संवाद साधत वाहत होता. हा धबधबा आजवर दापोली तालुक्याबाहेर ‘अपरिचित’ होता. रोजच्या धावपळीतून मुक्त होऊन, निसर्गाच्या या निबीड अरण्यात स्वतःला हरवून बसण्याचा आनंद अफलातून आहे. पाण्याचे तुषार अंगावर झेलत सर्वांनी या ‘कोंडी’ धबधब्याचे सौंदर्य आपल्या डोळ्यात आणि मनात साठवून घेतले. निसर्गाचा हा अनमोल ठेवा अनुभवून परतताना प्रत्येकाच्या मनात ‘निसर्गाचे हे रूप असेच अबाधित राहो आणि माणसाने या पवित्र जागेचे पावित्र्य कायम राखावे’ ही एकच भावना होती.
स्थानिक मार्गदर्शक अविनाश देपोलकर यांनी आपल्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून भोजनादि सुविधांची दर्जेदार उपलब्धी दिली, तसेच धबधब्याविषयी आणि संपूर्ण परिसरविषयी माहिती दिली. उपक्रमाचे नियोजन ‘आम्ही आबासाहेबांचे निसर्गप्रेमी’ समूहाचे प्रमुख विलास महाडिक यांनी केले. मार्गदर्शक म्हणून पर्यटन अभ्यासक समीर कोवळे उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात पर्यटक समृद्ध तालुका दापोली असल्याचे कोवळे यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कोठेही माहिती नसलेल्या या धबधब्याच्या नदी पात्रातील प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा पाहून साहित्यिक आणि पर्यटन-पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर तीव्र नाराजी नोंदवली. जवळपास अपरिचित धबधब्याच्या ठिकाणी थेट नदी पात्रात कचरा असणे वेदनादायी असल्याचे ते म्हणाले. खरंतर पर्यटक म्हणून आपण स्वतःसोबत नेलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, खाण्याचे पदार्थ आणि इतर कचरा एका पिशवीत गोळा करून परत आणणे आवश्यक आहे. आगामी काळात या धबधब्यावर होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता, धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कचरा कुंड्यांची आवश्यकता असेल. मुख्य नदीपात्राजवळ कचरा कुंड्या ठेवू नयेत, कारण वारे किंवा प्राण्यांमुळे तो कचरा नदीत जाऊ शकतो. स्थानिक प्रशासनाने नदीपात्रात किंवा परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून मोठा आर्थिक दंड ठोठावण्याचे नियोजन केल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकतो. त्या दृष्टीने माहितीफलक उपयुक्त ठरू शकतात. स्थानिक लोक हे त्या परिसराचे खरे रक्षक असतात. स्थानिकांनी एकत्र येऊन ‘पर्यटन समिती’ बनवून काम करण्याची आवश्यकता वाटेकर यांनी नमूद केली.
धबधब्याच्या भेटीनंतर सर्वांनी चिखलगावचे लोकमान्य टिळक मंदिर वास्तू, गाव पाहाणी, कोळथरे आगोम आयुर्वेद, कोळथरे समुद्रकिनारा आदी ठिकाणांना भेटी दिल्या. माधव महाजन यांनी उभारलेल्या वाईन कारखान्याला भेट देऊन सर्वांनी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. यावेळी सीमा कदम, स्मिता वीरकर, वृषाली गोगटे, विद्या पाटणकर, श्रध्दा विचारे, मंगला दळी, वृषाली सुर्वे, जान्हवी बापट आदी सहभागी झाले होते.




