
रत्नागिरी पोलिसांचे गोपाळगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान; ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढाकार
रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाने ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने सोमवारी गोपाळगड किल्ला परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत किल्ला परिसराची साफसफाई केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि जतन व्हावे, तसेच नागरिकांमध्ये ऐतिहासिक स्थळांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. समुद्रकिनारी वसलेला गोपाळगड किल्ला हा कोकणातील महत्त्वाचा ऐतिहासिक सागरी किल्ला असून त्याचे संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
दरम्यान, किल्ल्याच्या सद्यस्थितीबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही सुरू असून संबंधित बाबींची दखल घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा, अपप्रचार किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले.
कोणतीही संशयास्पद बाब, तक्रार किंवा माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ डायल ११२, रत्नसेतू चॅटबॉट किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांकडून करण्यात आले आहे




