
रत्नागिरीत राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेला प्रारंभ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे कै. प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती सुखदा देव यांच्या हस्ते शनिवारी साळवी स्टॉप येथील नक्षत्र हॉल येथे झाले. त्यानंतर डुप्लिकेट आणि पेअर प्रकाराच्या स्पर्धेला सुरवात झाली.
याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनचे सचिव अनिरुद्ध संझगिरी, स्पर्धा संचालक राजीव देव, रत्नागिरी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले, सचिव सचिन जोशी, खजिनदार विनायक मुळ्ये, चिंतामणी दामले आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. याप्रसंगी श्रीमती सुखदा देव यांनी ब्रिज असोसिएशनला मदतीचा धनादेश दिला. उद्या (ता. ७) सायंकाळी स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. स्पर्धेत मुंबई, पुणे, गोवा, बेळगांवी, कोल्हापूर, राजापूर, देवगड, खेड, सावंतवाडी इ. भागांतून आणि यजमान रत्नागिरीतील खेळाडू सहभागी झाले आहेत. विजेत्यांना एकूण ४३ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
चौकट १
९२ वर्षी खेळाडूचा सत्कार
या स्पर्धेत पुण्यातील ९२ वर्षांचे खेळाडू अरुण सदाशिव पाटणकर सहभागी झाले आहेत. त्यांचा विशेष सत्कार रत्नागिरी ब्रिज असोसिएशनतर्फे करण्यात आला. ते म्हणाले की, १९४८ सालापासून म्हणजे ७८ वर्षे मी ब्रिज खेळतोय. मी २१ वर्षे योग शिक्षक असून त्यामुळे माझी तब्बेत चांगली आहे. यामुळे ब्रिजमुळे डोकं ठिक राहतं. नोकरीनिमित्त भारतभर फिरलो. मी रत्नागिरीत स्पर्धेसाठी दरवर्षी येतो.




