महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन​५० टक्के योजना, बीजभांडवल आणि १ लाख थेट कर्ज योजनेचा लाभ घेता येणार​अर्जदारांनी ‘महादिशा’ संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.


​रत्नागिरी, दि. ८ ):- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय रत्नागिरी यांच्यामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी विविध स्वयंरोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ५० टक्के अनुदान योजना, बीजभांडवल योजना आणि १ लाख थेट कर्ज योजना राबविल्या जात असून, इच्छुकांनी महामंडळाच्या https://mahadisha.mpbcdc.in/login या संकेतस्थळावर त्वरित ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
​या सर्व योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत आणि महामंडळामार्फत राबविल्या जात असून, यासाठी अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
​योजनांचे स्वरूप खालीलप्रमाणे:
​१) ५० टक्के अनुदान योजना:
​प्रकल्प मर्यादा: रुपये ५०,०००/- पर्यंत.
​अनुदान: प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये २५,०००/- पर्यंत महामंडळाकडून अनुदान दिले जाते.
​बँक कर्ज: उर्वरित रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरूपात दिली जाते, ज्यावर बँकेच्या नियमानुसार व्याज आकारले जाईल.
​२) बीजभांडवल योजना:
​प्रकल्प मर्यादा: रुपये ५०,००१/- ते रुपये ५ लाखांपर्यंत.
​महामंडळ सहभाग (बीजभांडवल): प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के द.सा.द.शे. व्याजदराने दिले जाते (या राशीमध्ये महामंडळाच्या रुपये ५०,०००/- अनुदानाचा समावेश आहे).
​बँक कर्ज: ७५ टक्के रक्कम बँकेमार्फत कर्ज म्हणून दिली जाते.
​परतफेड व इतर: कर्ज परतफेड ३ ते ५ वर्षांच्या आत समान मासिक हप्त्यांमध्ये करावी लागते. यामध्ये अर्जदाराचा स्वतःचा सहभाग ५ टक्के असणे आवश्यक आहे.
​३) १ लाख थेट कर्ज योजना:
​प्रकल्प मर्यादा: रुपये १ लाख पर्यंत.
​रचना: महामंडळाचा सहभाग रुपये ४५,०००/- (४ टक्के व्याजदर), महामंडळाचे अनुदान रुपये ५०,०००/- आणि अर्जदाराचा स्वतःचा सहभाग रुपये ५,०००/- अशी या योजनेची रचना आहे.
​परतफेड: या कर्जाची परतफेड ३६ महिन्यांच्या (३ वर्ष) आत करणे बंधनकारक आहे.
​अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता व कागदपत्रे:
​पात्रता: अर्जदार अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा. ५० टक्के व बीजभांडवल योजनेसाठी वय १८ ते ५० वर्षे, तर थेट कर्ज योजनेसाठी वय १८ ते ४५ वर्षे असावे. ग्रामीण व शहरी दोन्ही विभागांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये ३ लाखांपर्यंत असावी. अर्जदार थकबाकीदार नसावा.
​आवश्यक कागदपत्रे: सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, ओळख व पत्त्याचा शासकीय पुरावा (उदा. आधार कार्ड प्रत), व्यवसायाचे कोटेशन आणि आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल (Project Report).
​व्यवसायानुरूप इतर दाखले: व्यवसाय जागेचा पुरावा, वाहन किंवा इतर तांत्रिक व्यवसायासाठी आवश्यक लायसन्स, परमिट, बॅच नंबर, बँक खाते क्रमांक आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत.
​महत्त्वाची सूचना:
​ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून अर्जाच्या तीन प्रती मूळ कागदपत्रांसह स्वतः महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रत्नागिरी येथे उपस्थित राहून सादर कराव्यात. त्रयस्त व्यक्ती किंवा कोणत्याही मध्यस्थामार्फत आलेले कर्ज अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
​०००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button