
नाचणे येथे ७.५ कोटींच्या बनावट फेरफार व फसवणुक प्रकरणातील संशयितांना जामीन
रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे येथील करोडो रुपयांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या बनावट फेरफार आणि फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी उमा उदय गुजर यांच्यासह इतर संशयितांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना कडक अटी शर्तीवर आणि दोन्ही संशयितांसाठी मिळून ५० हजार रुपयांचा जामीन न्यायालयात देण्यात आला आहे.
सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाचे वकील ऍड. राजेंद्र घोरपडे अत्यंत प्रखर विरोध दर्शवला. आरोपींनी न्यायालयाचे आधीचे आदेश जाणीवपूर्वक लपवून ठेवून, महामार्ग १६६ च्या भूसंपादनातून सहदायिकांचे तब्बल ७.५ कोटी रुपयांचे अनुदान बेकायदेशीररीत्या लाटले आहे, असा गंभीर आरोप ऍड. घोरपडे यांनी न्यायालयात केला. फसवणूक करून मिळविलेल्या या मोठ्या रक्कमेसह आरोपी परदेशात पळून जाण्याची दाट शक्यता असल्याने त्यांना जामीन देऊ नये आणि त्यांचे पारपत्र जप्त करण्यात यावे, अशी मागणी फिर्यादी पक्षातर्फे करण्यात आली होती. जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपीवर अत्यंत कठोर अटी लादल्या आहेत. या अटींनुसार, आरोपींना पुराव्यांशी कोणतीही छेडछाड न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. न्यायालयाच्या तसेच, पूर्वपरवानगीशिवाय त्यांना देश सोडून जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




