
दापोली मौजे दापोली रस्त्याचिखलमय रस्त्यामुळे नागरिक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी
◾दापोली :- दापोली कडून मौजे दापोली कडे जाणारा रस्ता नेहमीप्रमाणे पहिल्या पावसात पटेल स्वामी जवळ रस्ता चिखलमय झाला आहे. पावसाळा सुरू होताच शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. संबंधित भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लाल माती आणि चिखल साचल्याने वाहनचालक व पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.
सततच्या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या कडेला निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी आणि माती रस्त्यावर येत असून संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची तातडीने साफसफाई करून डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करावे, तसेच पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी गटारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पावसाळा अद्याप सुरूच असल्याने ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.




