
तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही; मंत्र्यांची मोठी ग्वाही, विभागाची अवस्था दयनीय असल्याची कबुली!
मुंबई : राज्यात बेकायदा गुटखा विक्री, अन्नपदार्थांमधील भेसळ, बोगस औषधांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केल्याने चर्चेत आलेला अन्न आणि औषध प्रशासन विभाग आवश्यक संसाधनांनी अभावग्रस्त असून, विभागाची अवस्था दयनीय असल्याची कबुली विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
भेसळखोरांच्या विरोधात धडक कारवाई करणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांची तीन वर्षे बदली करू नये, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी चर्चेत केली. त्यावर मुंढे यांची बदली केली जाणार नाही, अशी ग्वाही झिरवाळ यांनी दिली. तसेच दूध भेसळखोरांच्या विरोधात मकोका कायद्याखाली कारवाई व्हावी, यासाठी विधेयक आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाडेतत्त्वावर घ्यावी लागतात वाहने
अन्न आणि औषध प्रशासन विभागाची स्वतःची अशी प्रयोगशाळा नाही. नाशिक, पुणे, नागपूर आणि यवतमाळ येथे विभागाची स्वतःची प्रयोगशाळा लवकरच सुरू केली जाईल. अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर वाहने घेतली जातील.
औषध निरीक्षकांची मंजूर पदे २००, भरलीत फक्त ४१
राष्ट्रवादीचे (अजित पवार) काशिनाथ दाते यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या घणाघाती चर्चेला उत्तर देताना झिरवाळ यांनी विभागात असलेल्या कमतरतेची माहिती दिली. विभागातील ३५० मंजूर पदांपैकी ३१६ कार्यरत असून, ४३ पदे रिक्त आहेत.
औषध निरीक्षकांची २०० पदे मंजूर असून, यापैकी १५९ पदे भरलेली नाहीत. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची १९७ पदे भरली आहेत. औषध निरीक्षक पदासाठी ४०० कर्मचाऱ्यांची गरज आहे.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार, एक हजार अन्न आस्थापनांना एका अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. त्यानुसार राज्यात ११०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. जिल्हास्तरावर विभागाची कार्यालये नाहीत, अशी खंत झिरवाळ यांनी व्यक्त केली.
बदलीसाठी २५० कोटी गोळा
मुंढे यांची बदली करण्यासाठी औषध कंपन्यांनी २५० कोटी रुपये गोळा केल्याचा दावा राष्ट्रवादी (शरद पवार)चे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.




