खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; जादा बिल आकारल्यास फौजदारी कारवाईचा इशारा

राज्यातील खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या मनमानी बिल आकारणीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व खासगी रुग्णालयांना उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक करण्यात येणार असून, त्यानुसारच रुग्णांकडून शुल्क आकारावे लागणार आहे.

विधानसभेत माहिती देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दर रुग्णालयाच्या दर्शनी भागात स्पष्टपणे प्रदर्शित करणे आवश्यक राहणार आहे. दरफलकावर नमूद केलेल्या दरांनुसारच बिल आकारावे लागणार असून, त्यापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

तसेच, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे उकळल्याचे आढळल्यास संबंधित रुग्णालयांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. याशिवाय अशा रुग्णालयांना काळ्या यादीतही टाकण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला.

सरकारच्या या निर्णयामुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला आळा बसण्याची शक्यता असून, रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button