
कोकण रेल्वे दुपदरीकरणाला वेग? केंद्राकडे निधी प्रस्ताव; प्रवाशांना दिलासा मिळण्याची आशा
कोकण रेल्वेवरील वारंवार होणारा विलंब, वाढती प्रवासी व मालवाहतूक आणि गणेशोत्सव काळातील अतिरिक्त गाड्यांच्या नियोजनातील अडचणी दूर करण्यासाठी दुपदरीकरणाच्या प्रकल्पाला पुन्हा गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोकण रेल्वे महामंडळाने दुपदरीकरणाच्या पुढील टप्प्यासाठी केंद्र सरकारकडे निधीचा प्रस्ताव सादर केला असून प्राधान्याच्या विभागांमध्ये तांत्रिक तपासणीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी पावसाळापूर्व तयारीच्या आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली. मुंबई, गोवा, कर्नाटक आणि केरळला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर गेल्या काही वर्षांत प्रवासी व मालवाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. मात्र मार्गाचा बहुतांश भाग अजूनही एकेरी असल्याने रेल्वेच्या वहनक्षमतेवर मर्यादा येत आहेत.
सुमारे ७४१ किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वे मार्गापैकी केवळ रोहा-वीर (४६.८ किमी) आणि मडगाव-माजोर्डा (७.६६ किमी) या विभागांचेच दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच ९० टक्क्यांहून अधिक मार्ग आजही एकेरी रेल्वे रुळांवरच अवलंबून आहे. त्यामुळे गाड्यांना स्थानकांवर क्रॉसिंगसाठी थांबावे लागते आणि एका गाडीचा विलंब संपूर्ण मार्गावरील वेळापत्रकावर परिणाम करतो.
सह्याद्रीच्या पर्वतरांगा, खोल दऱ्या, शेकडो पूल आणि ९० हून अधिक बोगद्यांमुळे हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. निधीअभावी आणि भौगोलिक अडचणींमुळे गेल्या दशकभरापासून चर्चेत असलेल्या या प्रकल्पाला अपेक्षित गती मिळू शकली नव्हती.
गणेशोत्सवातील गर्दी कमी होण्यास मदत
दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात परतत असल्याने विशेष गाड्यांची मोठी मागणी असते. मात्र मर्यादित मार्गक्षमता असल्याने अतिरिक्त गाड्या चालविताना रेल्वे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. दुपदरीकरण पूर्ण झाल्यास भविष्यात अधिक विशेष गाड्या चालविणे आणि गर्दीचे व्यवस्थापन करणे सुलभ होणार आहे.
दोन महत्त्वाचे टप्पे प्राधान्यक्रमावर
सध्या वैभववाडी रोड–माजोर्डा (१५१ किमी) आणि ठोकूर–मूकांबिका रोड (बिंदूर) (११२ किमी) या विभागांना प्राधान्य देण्यात आले आहे. या दोन्ही विभागांसाठी व्यवहार्यता अभ्यास आणि तांत्रिक तपासणी सुरू असून मंजुरी मिळाल्यास सिंधुदुर्ग, गोवा आणि किनारपट्टी कर्नाटकातील प्रवाशांना अधिक वेगवान व सुरळीत रेल्वे सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
९० टक्के मार्ग अजूनही एकेरी
कोकण रेल्वेच्या एकूण ७४१ किलोमीटर मार्गापैकी केवळ ५४ किलोमीटरहून कमी अंतराचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा ताण अजूनही एकेरी मार्गावरच आहे. विशेषतः कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी आणि मडगाव या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश असलेल्या वैभववाडी रोड–माजोर्डा टप्प्याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.




