कृषी विभागाची ‘खरीप-मोहीम’; आधुनिक तंत्रज्ञानाने खर्च कमी करत शाश्वत शेतीकडे पाऊल


आगामी खरीप हंगाम २०२६ वर ‘अल निनो’ (Al Niño) आणि हवामान बदलाचे सावट लक्षात घेता, जिल्हा कृषी विभागाने कंबर कसली आहे. मान्सूनच्या सुरुवातीच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पिकांची उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि नवीन सुधारित तंत्रज्ञान थेट बांधापर्यंत पोहोचवणे, या त्रिसूत्रीवर आधारित ‘खरीप मोहीम’ जिल्हाभर राबविण्यात येत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना या मोहिमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायत स्तरावर एकाच वेळी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांचे राबविण्यात येत असून, त्यातील प्रमुख उपक्रम आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा हा सविस्तर आढावा:
१. माती परीक्षण: रासायनिक खतांच्या अनावश्यक खर्चाला फाटा
अनेकदा शेतकरी गरजेपेक्षा जास्त किंवा चुकीच्या खतांचा वापर करतात, ज्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो आणि पैसाही वाया जातो. फायदा: जमिनीतील घटकांची अचूक कमतरता समजल्यामुळे गरजेनुसारच संतुलित खतांची मात्रा दिली जाते. यामुळे जमिनीची सुपीकता तर टिकतेच, शिवाय उत्पादन खर्चात थेट २० ते २५ टक्के बचत होते.
२. बीज प्रक्रिया: पिकांचे सुरुवातीचे ‘सुरक्षा कवच’
बियाण्यांपासून उद्भवणारे बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणीपूर्वीच बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये ट्रायकोडर्मा, शिफारसीत बुरशीनाशके आणि जैविक संवर्धकांचा वापर केला जात आहे.
फायदा: या प्रक्रियेमुळे उगवणारी रोपे सशक्त आणि रोगप्रतिकारक बनतात. परिणामी, सुरुवातीच्या काळात लागणारी महागडी रासायनिक कीटकनाशके खरेदी करण्याचा खर्च पूर्णपणे वाचतो.
३. घरगुती उगवण क्षमता तपासणी: दुबार पेरणीचे संकट टळणार
बाजारातून आणलेले किंवा मागील २-३ वर्षांचे घरचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यापूर्वी त्याची क्षमता तपासणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी गोणपाटावर किंवा मातीत घरच्या घरी १०० बिया ठेवून ही चाचणी करावी.
फायदा: बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यास ऐन वेळेस होणारे दुबार पेरणीचे संकट आणि आर्थिक नुकसान टाळता येते. पेरणीसाठी किमान ७० ते ७५ टक्के उगवण क्षमता असणारेच बियाणे वापरावे.
४. एस.आर.आय. (SRI) भात लागवड: कमी पाण्यात विक्रमी उत्पादन
भात उत्पादक पट्ट्यासाठी ‘श्री’ सघन भात लागवड पद्धती वरदान ठरणार आहे. पारंपारिक पद्धतीला छेद देणारे हे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे.
बियाण्याची बचत: पारंपारिक पद्धतीपेक्षा यात खूप कमी म्हणजे एकरी अवघे २ ते ३ किलो बियाणे पुरेसे होते.
लागवडीचे तंत्र: गादी वाफ्यावरील अवघ्या १० ते १२ दिवसांची कोवळी रोपे उपटून, एका चूडात फक्त १ किंवा २ रोपे लावली जातात.
या पद्धतीमुळे भाताच्या पिकाला अफाट फुटवे येतात, लोंब्यांची लांबी वाढते आणि पाण्याची मोठी बचत होते. एकंदरीत भात उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत लक्षणीय वाढ दिसून येते.
५. गोकृपा अमृत मोहीम: अवघ्या ₹२५० मध्ये नैसर्गिक शेती!
रासायनिक खतांचा वाढता खर्च कमी करून शेती पूर्णपणे निसर्गपूरक करण्यासाठी ‘गोकृपा अमृत’ निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे.
फायदा: या जिवाणूयुक्त द्रवामुळे जमीन कमालीची भुसभुशीत होते आणि पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ झपाट्याने होते. फळांचा दर्जा, चव आणि पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
बचतीचे गणित: गोकृपा अमृत अवघ्या ७ दिवसांत तयार होते आणि ते ६ महिन्यांपर्यंत टिकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फक्त २५० रुपयांच्या किरकोळ खर्चात तब्बल ४० हजार रुपयांचे गोकृपा अमृत तयार होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढतो.
६. अल निनो विरुद्ध लढा: ग्रामस्तरावर ‘शिवार फेरी’
अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाण्याचा ताण व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने ग्रामपंचायत स्तरावर ‘शिवार फेऱ्यांचे’ आयोजन केले आहे.
जलसंधारण आणि मशागतीचे नियोजन:
शिवार फेरीच्या माध्यमातून उताराला आडवी मशागत, प्लास्टिक व जैविक आच्छादन (Mulching), आंतरमशागत, जुनी मजगी व बांधांची दुरुस्ती, वनराई बंधारे, शेततळे, जलकुंड, गॅबियन बंधारे आणि सिमेंट नाला बांध यांसारख्या कामांचे स्थळ निश्चित करून जनजागृती केली जात आहे. यामुळे पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरून भूजल पातळी वाढेल.
हवामान अनुकूल भाताचे वाण:
पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या आणि लवकर पक्व होणाऱ्या खालील वाणांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे: दुष्काळ सहनशील वाण: सह्याद्री-२, रत्नागिरी-८, कर्जत-३. लवकर पक्व होणारे वाण: रत्नागिरी-१, ६, २४ आणि ७३.
७. फळबागांसाठी ‘CRA’ आणि पी.व्ही.सी. पाईप तंत्रज्ञान
हवामान अनुकूल शेती (Climate Resilient Agriculture – CRA) अंतर्गत फळबागा वाचवण्यासाठी एक अत्यंत अभिनव प्रयोग राबवला जात आहे.
पी.व्ही.सी. पाईप पॅटर्न: नवीन फळझाडांची लागवड करताना झाडाच्या चारही बाजूंना उभे पी.व्ही.सी. पाईप टाकून त्यात खते, वाळू आणि मोठी खडी टाकली जाते. यामुळे पाणी थेट झाडाच्या मूळ उपसा क्षेत्रापर्यंत पोहोचते. या तंत्रज्ञानामुळे पावसातील प्रदीर्घ खंडात किंवा अल निनोच्या तीव्र दुष्काळातही सुरुवातीची २-३ वर्षे फळबागा उत्तम रीतीने जिवंत राहतात. याशिवाय जुन्या फळबागांसाठी ठिबक सिंचन, सेंद्रिय मल्चिंग आणि हवामान अंदाजानुसार पाणी व खत व्यवस्थापन (संरक्षित सिंचन) करण्याचे मार्गदर्शन केले जात आहे.
“बदलत्या हवामानाचे आव्हान मोठे आहे, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. शेतकऱ्यांनी जुन्या पद्धती बदलून उत्पादन खर्च कमी करावा आणि शाश्वत शेतीकडे वळावे. या खरीप मोहिमा केवळ सरकारी उपक्रम नसून ते शेतकऱ्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचे माध्यम आहेत.”
शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा आणि कृषी विभागाच्या या महा-मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
– अमृता धूंदूर-भातडे
जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button