कोकणात लहान प्रवासी बोटींवर भर; जलवाहतुकीसाठी नवा आराखडा तयार


मुंबई–कोकण मार्गावरील रस्ते वाहतुकीवरील वाढता ताण लक्षात घेऊन राज्य सरकारने कोकण किनारपट्टीवरील प्रवासी जलवाहतूक नव्या स्वरूपात सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी माहिती दिली.

यापूर्वी सुरू करण्यात आलेली मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक सेवा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने बंद पडली होती. मोठ्या जहाजांच्या तुलनेत कमी खर्चिक आणि अधिक व्यवहार्य पर्याय म्हणून आता सुमारे १०० प्रवासी क्षमतेच्या लहान बोटींचे जाळे उभारण्याचा विचार सुरू आहे. या संदर्भात एका खासगी कंपनीशी सरकारची प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

या प्रस्तावित योजनेद्वारे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांना जलमार्गाने जोडण्याचे नियोजन आहे. भविष्यात अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, दापोली, गुहागर, जयगड, रत्नागिरी, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले या किनारी शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रवासी सेवा सुरू करण्याचा विचार आहे.

या उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक नागरिकांना पर्यायी प्रवास व्यवस्था उपलब्ध होईल, तसेच मत्स्य व्यवसाय आणि किनारी भागातील अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मात्र, ही योजना यशस्वी करण्यासाठी आधुनिक जेट्टी, सुरक्षित प्रवासी टर्मिनल, ऑनलाइन तिकीट व्यवस्था, परवडणारे भाडे, नियमित वेळापत्रक आणि वर्षभर सातत्याने सेवा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यातील समुद्री परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षिततेचे निकषही काटेकोरपणे पाळले जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच, खाजगी जलवाहतूक कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास ही सेवा अधिक प्रभावीपणे सुरू करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button