एस.टी. बसने धडक दिल्याने गायीचे वासरू ठार; चिपळूणच्या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल


रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडशी येथे एस.टी. बस चालकाने आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या गायीच्या वासराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सदर वासरू जागीच ठार झाले असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात ११ जून २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खेडशी येथील श्रीराम फायनान्स गोडावूनच्या समोर घडला. आरोपी एस.टी. बस चालक मुरलीधर पुंडलिकराव चांभारे (रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील चिपळूण ते रत्नागिरी अशी धावणारी एस.टी. बस (क्रमांक एम.एच.२०/ बीएल/३५७७) घेऊन रत्नागिरीच्या दिशेने जात होता. खेडशी येथील श्रीराम फायनान्स गोडावून समोर बस आली असता, चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस अत्यंत हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवली.

यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पांढरट, तांबूस रंगाच्या गायीच्या वासराला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न न करता बसने त्याला थेट धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये ते निष्पाप वासरू जागीच ठार झाले.

याप्रकरणी खेडशी येथील लक्ष्मीनारायण नगरमधील औंकार अपार्टमेंटमध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक फिर्यादी गणेश विजय गायकवाड (वय ४२ वर्ष) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ११ जून रोजी दुपारी ४ वाजून ३ मिनिटांनी आरोपी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.पोलिसांनी या घटनेप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या अपघाताचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button