आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर विशेष मोहिम राबविल्यानंतर रत्नागिरी ’अन्न-औषध’चा जिल्ह्यातही धडाका


पुण्यातील विषारी दारूच्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून याची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर विशेष तपासणी मोहिमेचे आदेश दिले आहेत. याच धर्तीवर जिल्ह्यातही मिथेनॉलचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, जिल्ह्यातील सर्व १६ मिथेनॉल परवानाधारकांची कसून तपासणी केली जात आहे.
रत्नागिरी येथील अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव यांनी या मोहिमेबाबत माहिती देताना सांगितले, प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांवर बारीक लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात एकूण १६ मिथेनॉल परवानाधारक असून, त्यापैकी दोघांचे उद्योग सध्या बंद आहेत, तर एक उत्पादक आहे.
आयुक्त मुंढे यांच्या स्पष्ट निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येत असून, आतापर्यंत पाच जणांची विशेष तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यापूर्वी नियमित तपासणी झाली असली तरी, सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा सखोल तपासणी केली जात आहे. उर्वरित परवानाधारकांची तपासणीही लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असेही यादव यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, ज्या परवानाधारकांकडे अटी व शर्तीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यांना तत्काळ नोटीस बजावण्यात येत आहे.
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी संपूर्ण विभागाला एका वेगळ्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीत आणले आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र हे ब्रीदवाक्य समोर ठेवून धडक कारवाईची मालिका सुरू केली आहे.
मुंढे यांच्या कार्यशैलीची प्रचिती भिवंडीतील कारवाईतून नुकतीच आली होती, जिथे त्यांनी एका कंपनीवर धाड टाकून तब्बल ५,९२९ किलो मिथेनॉलचा बेकायदेशीर साठा जप्त केला होता. त्यानंतर आता राज्यभरात त्यांनी तपासणीचा वेग वाढवला आहे.
केवळ मिथेनॉलच नव्हे, तर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांविरुद्धही त्यांनी राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक महत्त्वाच्या शहरांत त्यांनी धाडी टाकून नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर कठोर कायदेशीर कारवाई केली आहे. तसेच, नामांकित कंपन्यांच्या औषधांच्या दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवरही त्यांनी कडक भूमिका घेतली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button