“१ लाख कोटींचे नुकसान.”, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढताच अर्थमंत्र्यांनी मांडले थेट गणित!

Fuel Tax Statement By Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यास सरकारला सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान सोसावे लागेल. त्यांनी लोकांना दिलासा देण्याची आवश्यकताही अधोरेखित केली आणि स्पष्ट केले की, “भारताला भीतीचे वातावरण निर्माण करणे परवडणारे नाही.”

आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले. भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या (SIDBI) ३७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. गेल्या १० दिवसांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे. सोमवारी पेट्रोल २.६१ रुपये प्रति लिटरने, तर डिझेल २.७१ रुपये प्रति लिटरने महाग झाले, ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट आणि वाहतुकीचा खर्च यांवर आणखीच ताण पडला आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी आणि परदेश दौरे रद्द करण्याचे व इंधन बचतीचे आवाहन केले होते. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. यालाही सीतारामन यांनी उत्तर दिले. देशात “भीतीचे वातावरण निर्माण करणे देशाला परवडणारे नाही,” असे त्या म्हणाल्या. तसेच, शब्द आणि कृती या दोन्ही माध्यमातून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

मध्यपूर्वेतील संकटाला आता तीन महिने पूर्ण होत असताना, अर्थमंत्र्यांनी इंधन, खते आणि परकीय चलन यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. तसेच जागतिक अनिश्चितता असूनही भारताची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे ठामपणे नमूद केले. त्यांनी वाढत्या जागतिक दबावांकडेही लक्ष वेधले. खतांच्या किमती ‘अकल्पनीय’ पातळीवर पोहोचल्या आहेत, तर सोन्याच्या वाढत्या दरांमुळे बाह्य आघाडीवर ‘काही आव्हाने’ निर्माण होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

काही ‘नकारात्मक विचारसरणीच्या’ लोकांनी सर्व काही ‘कोलमडून पडत आहे’ असे आरोप सुरु केले आहेत, परंतु हे अजिबात योग्य नाही, असे अर्थमंत्र्यांनी नमूद केले. “सामान्य जनतेकडून स्वतःहून जे काही चांगले कार्य केले जात आहे, ते विसरले जाते. आणि त्याऐवजी एक निराशावादी व संशयी दृष्टिकोन निर्माण केला जातो, जे पूर्णपणे चुकीचे आहे”, असे त्या म्हणाल्या.

“ही आव्हाने प्रामुख्याने बाह्य घटकांमुळे निर्माण झाली आहेत, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. तसेच, भारताची देशांतर्गत आर्थिक स्थिती आजही सकारात्मक आणि भक्कम आहे, हे देखील आपण मान्य केले पाहिजे,” असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button