
मुंबईत भीषण स्फोट; चेंबूरमध्ये केमिकल टँकरचा स्फोट, दोघे गंभीर जखमी
मुंबईतील चेंबूर परिसरात शुक्रवारी केमिकल टँकरचा भीषण स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्फोट इतका जोरदार होता की परिसरातील अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा तसेच पार्किंगमधील काही वाहनांच्या काचाही फुटल्या. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. परिसर सुरक्षित करण्यात आला असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे चेंबूर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




