अपघातानंतर भोके-आंबेकरवाडी ग्रामस्थ आक्रमक; महामार्गावरील फाट्यावर तातडीने सुरक्षितता उपाययोजनांची मागणी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोके-आंबेकरवाडी फाटा येथे वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर समस्त भोके-आंबेकरवाडी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली.

११ जुलै २०२६ रोजी याच फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ कनगुटकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनामध्ये महामार्गाच्या दोन्ही बाजूंना रंबल स्ट्रिप्स किंवा गतिरोधक, अपघातप्रवण क्षेत्राचे इशारा फलक, रिफ्लेक्टर्स, कॅट आय, सोलर ब्लिंकर लाईट्स, रोड मार्किंग, वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून कायमस्वरूपी सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी निवेदन देताना युक्ता योगेश आंबेकर (युवती सेना तालुका प्रमुख), संदीप आंबेकर (वाडी गावकर), शांताराम गोपाळ आंबेकर, संजय लक्ष्मण गावडे (माजी उपसरपंच), राजेंद्र आंबेकर, सचिन चव्हाण, शंकर आंबेकर, अनुष्का संदीप आंबेकर, पार्वती रामा माळप, अनंत गुणाजी आंबेकर यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मा. कार्यकारी अभियंता जाधव मॅडम तसेच कुलकर्णी साहेब यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर ग्रामस्थांनी सुचविलेल्या सर्व सुरक्षितता उपाययोजनांची अंमलबजावणी शक्य तितक्या लवकर करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे लवकरच भोके-आंबेकरवाडी फाटा येथे आवश्यक सुरक्षा उपाय राबविले जातील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button