
सौदी अरेबियाने का सुनावली होती मृत्यूदंडाची शिक्षा,३४ कोटींची ‘ब्लड मनी’ देऊन अब्दुल रहीम भारतात परतले
दोन दशकांची शिक्षा, फाशीची टांगती तलवार आणि पोटच्या मुलाची वाट पाहणारी वृद्ध आई… या सर्व वेदनांचा शेवट गुरुवारी अखेर गोड झाला. सौदी अरेबियातील तुरुंगात २० वर्षे मृत्यूशी झुंज देणारा केरळचा अब्दुल रहीम ब्लड मनीची रक्कम भरल्यानंतर गुरुवारी भारतात परतला. विमानतळावर उतरताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे जोरदार स्वागत केले. महत्त्वाचे म्हणजे ईदच्या दिवशीच रहीम घरी परतल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
विमानतळावर जंगी स्वागत; आईला पाहताच अश्रू अनावर
अब्दुल रहीम विमानतळावर पोहोचताच प्रसिद्ध उद्योगपती बॉबी चेम्मनूर यांनी त्याला मिठी मारून त्याचे स्वागत केले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना पाहून रहीमने हात उंचावून आपला आनंद व्यक्त केला. “माझा जीव वाचवण्यासाठी आणि मला माझ्या आईकडे परत आणण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्या प्रत्येक व्यक्तीचा मी ऋणी आहे,” अशा शब्दांत त्याने कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर तो थेट कोझिकोडमधील आपल्या घरी पोहोचला. गेल्या २० वर्षांपासून दारात डोळे लावून बसलेल्या वृद्ध आईला पाहताच रहीमने तिला घट्ट मिठी मारली. आई आणि मुलाचा तो भावनिक क्षण पाहून तिथे उपस्थित हजारो गावकऱ्यांचे आणि नातेवाईकांचे डोळे पाणावले. गर्दी समोर आल्यावर रहीम हात उंचावत राहिला, पण गळा दाटून आल्यामुळे त्याला एक शब्दही बोलता आला नाही.
२००६ मधील एक ‘तो’ दुर्दैवी अपघात आणि मृत्युदंड
अब्दुल रहीम हा व्यवसायाने ड्रायव्हर होता. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी तो २००६ मध्ये पहिल्यांदा सौदी अरेबियाला गेला. तिथे त्याला एका १७ वर्षांच्या दिव्यांग सौदी मुलाच्या देखभालीचे काम मिळाले. तो मुलगा श्वास घेण्यासाठी एका कृत्रिम लाइफ सपोर्ट सिस्टमवर अवलंबून होता.
२४ डिसेंबर २००६ रोजी गाडी चालवत असताना, अनपेक्षितपणे अब्दुल रहीमचा हात त्या मुलाच्या लाईफ सपोर्टला लागला आणि ती बंद झाली. यामुळे तो मुलगा गाडीतच बेशुद्ध झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या कुटुंबाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आणि रहीमला अटक झाली. सौदीच्या न्यायालयाने याला हत्या मानून २०१८ मध्ये रहीमला फाशीची शिक्षा सुनावली.
४ दिवसांत जमा झाले ३४ कोटी!
सौदी कायदे आणि इस्लामिक शरिया कायद्यानुसार, अशा अनपेक्षित गुन्ह्यांमध्ये जर पीडित कुटुंबाने माफी दिली, तर फाशी टळू शकते. या कायद्याला दियाह किंवा ब्लड मनी म्हटले जाते. सुरुवातीला मुलाच्या कुटुंबाने माफी देण्यास नकार दिला होता, मात्र अनेक वर्षांच्या कायदेशीर प्रयत्नांनंतर ते १५ मिलियन सौदी रियाल (सुमारे ३४ कोटी रुपये) घेऊन रहीमला माफ करण्यास तयार झाले.
रहीमच्या कुटुंबाकडे इतकी मोठी रक्कम असणे अशक्य होते. १८ एप्रिल २०२४ ही पैसे भरण्याची शेवटची तारीख होती. ही माहिती समोर येताच संपूर्ण केरळ आणि जगभरातील भारतीय नागरिक एकत्र आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून क्राउड फंडिंग सुरू करण्यात आली आणि अवघ्या ४ दिवसांत ३४ कोटी रुपयांचा निधी उभा राहिला. ही रक्कम सौदी प्रशासनाकडे जमा करून रहीमची सुटका करण्यात आली.
भारतीय दूतावासाकडून आभार
अब्दुल रहीमच्या सुटकेनंतर सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने आनंद व्यक्त केला आहे. “आपल्या कुटुंबापासून दोन दशके दूर राहिलेला अब्दुल रहीम अखेर भारतात परतत आहे. त्याच्या सुटकेसाठी सहकार्य करणाऱ्या सौदी प्रशासनाचे आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून एकत्र आलेल्या भारतीय समुदायाचे आम्ही मनापासून आभार मानतो,” असे दूतावासाने म्हटले.
सध्या सौदी अरेबिया, पाकिस्तान, इराण आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या इस्लामिक देशांमध्ये हा ब्लड मनीचा कायदा अस्तित्वात आहे, ज्याच्या मदतीने एका गरीब भारतीयाला आज नवीन जीवन मिळाले.




