
संगमेश्वर तालुक्यातील बामणोली स्टॉपजवळ डिझेल चोरणारी टोळी केली जेरबंद
संगमेश्वर तालुक्यातील बामणोली स्टॉपजवळ उभ्या असलेल्या डंपरमधून डिझेल चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात देवरुख पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून चोरीचे डिझेल जप्त केले आहे. आरोपींपैकी तिघेजण संगमेश्वर तालुक्यातील साडवली परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २७ मे रोजी मध्यरात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास बामणोली स्टॉप येथे उभ्या असलेल्या तीन डंपरमधून काही व्यक्ती डिझेल चोरत असल्याचे फिर्यादी संदीप विश्राम रावणंग आणि त्यांच्या मित्राच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.
या प्रकरणात पोलिसांनी शंकर धेनु राठोड (४७, रा. सातारा), शिवाजी बबन नेटके (३५), रोहित हनुमंत कांबळे (१९) आणि लखन हनुमंत कांबळे (२१, सर्व रा. संगमेश्वर, रत्नागिरी) यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी एमएच ०४ ईवाय ७३११, एमएच ०९ ईएम ४००४ आणि एमएच ०४ ईवाय ७३१२ या डंपरमधून सुमारे २०० लिटर डिझेल कॅनमध्ये काढून चोरी करण्याचा प्रयत्न केला. जप्त करण्यात आलेल्या डिझेलची किंमत सुमारे १९ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उदय झावरे आणि पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार एस. एच. करांडे पुढील तपास करीत आहेत.www.konkantoday.com




