
संगमेश्वर तालुक्यातील आरवली घाटात जयगडहून लोटेच्या दिशेने जाणाऱ्या डंपर पलटल्याने अपघात; चालक जखमी
संगमेश्वर तालुक्यातील आरवली घाटात जयगडहून लोटेच्या दिशेने जाणाऱ्या एका डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्वराज्य पेट्रोल पंपाजवळील धोकादायक वळणावर डंपर पलटी झाला. हा अपघात काल (४ मे) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला. यात चालक सलीम तहिदुल्लाह खान (६२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला आणि हाताला मोठी दुखापत झाली आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आरवली घाटातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि डंपर रस्त्यावरच आडवा झाला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी चालकाला तात्काळ संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातात डंपरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.




