
संगमेश्वरात तुरळ येथे दुर्दैवी घटना; फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-हारेकरवाडी परिसरात शिकाऱ्यांनी लावलेल्या फासकीत अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुरळ ते माखजन मार्गालगत खैराच्या झाडाला बेकायदेशीररीत्या फासकी लावण्यात आली होती. या मार्गाने जात असताना बिबट्याचा पाय फासकीत अडकला. सुटकेसाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले, मात्र त्यात तो झाडालाच लटकून राहिला. अखेर श्वास गुदमरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या दरम्यान ही बाब स्थानिक पोलीस पाटलांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिल्यानंतर विभागाचे पथक आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी फासकीसह झाडाचा भाग तोडून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.
या प्रकरणी वनविभागाने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून फासकी लावणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. कारवाईदरम्यान परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव, परिमंडळ वनाधिकारी सागर गोसावी, वनरक्षक सुप्रिया काळे, सुरज तेली, सहयोग कराडे तसेच पंच उपस्थित होते.
विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




