
शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत, शिक्षण मंडळाच्या आदेशाप्रमाणे सशस्त्र ध्वज निधी कसा गोळा करणार- संघटनेची शिक्षण विभागाशी चर्चा
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने सशस्त्र ध्वज निधी संकलनाबाबत शिक्षण विभागाशी सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय शिक्षणाधिकारी श्री. दीपक मेंगाणे यांची भेट घेऊन सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.
सध्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थी संख्येनुसार सशस्त्र ध्वज निधी जमा करणे शक्य होणार नसल्याचे संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच निधीची रक्कम मुख्याध्यापकांच्या स्तरावरून भरावी लागणार असल्याने त्याचा आर्थिक भार लक्षात घेऊन निधीची रक्कम निश्चित करण्यात यावी, अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शिक्षणाधिकारी श्री. दीपक मेंगाणे यांनी संघटनेच्या मागणीची सकारात्मक दखल घेत योग्य तो विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सागर पाटील यांनी दिली.




