
रिफायनरीविरोधातील संघटित लढ्याप्रमाणेच बारसू परिसरात प्रस्तावित खाजगी अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातही तीव्र आंदोलन उभारले जाईल – रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे
कोकणच्या पर्यावरणाला आणि स्थानिक जनजीवनाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही विनाशकारी प्रकल्पाला थारा दिला जाणार नाही. रिफायनरीविरोधातील संघटित लढ्याप्रमाणेच बारसू परिसरात प्रस्तावित खाजगी अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातही तीव्र आंदोलन उभारले जाईल असा खणखणीत इशारा बारसू–सोलगाव रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांनी दिला आहे. राज्य शासनाने उद्योगसमूहांशी केलेल्या सामंजस्य करारानंतर राजापूर तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, रिफायनरीनंतर आता बारसू परिसरात अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आणखी एका मोठ्या संघर्षाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
केंद्र सरकारने अणुऊर्जा क्षेत्रात खासगी कंपन्यांना प्रवेश देण्याच्या उद्देशाने लागू केलेल्या शांती कायद्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने मंगळवारी विविध बड्या उद्योगसमूहांशी करार केले.यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड, अदानी पॉवर, एनटीपीसी लिमिटेड तसेच बजाज समूहाशी संबंधित ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे.या माध्यमातून अणुऊर्जा क्षेत्रात सुमारे ६ लाख ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून १ लाख २३ हजार रोजगार निर्माण होतील, असा दावा शासनाकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने केलेल्या करारानुसार बारसू येथे अदानी पॉवर लिमिटेडच्या माध्यमातून ६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून जवळपास १२ हजार रोजगार निर्माण होतील,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयावर टीका करताना अमोल बोळे यांनी शासनावर जोरदार हल्लाबोल केला. शासनाला खरोखरच अणुऊर्जा प्रकल्प उभारायचा होता, तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षांपासून का रखडले आहे, याची उत्तरे आधी द्यावीत,असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यापूर्वी नाणारमधून बारसूकडे हलविण्यात आलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी एकजुटीने विरोध करत तो रोखण्यात यश मिळवले होते. आता त्याच धर्तीवर नव्याने प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पालाही जोरदार विरोध करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
कोकणात पर्यावरणपूरक आणि स्थानिकांना पूरक प्रकल्प आले तर त्यांचे स्वागतच केले जाईल, असे स्पष्ट करताना बोळे म्हणाले,अशा चांगल्या प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन देण्याचीही आमची तयारी आहे.मात्र कोकणच्या पर्यावरणाचा, शेतीचा,बागायतींचा,मच्छीमारी व्यवसायाचा आणि स्थानिकांच्या आरोग्याचा विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.
कोकणचे नैसर्गिक वैभव आणि स्थानिकांचे अस्तित्व वाचविणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे बारसू परिसरात अणुऊर्जा प्रकल्पाला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही.रिफायनरीविरोधातील लढ्याप्रमाणेच हा संघर्षही सनदशीर आणि संघटित पद्धतीने उभारला जाईल. शासनाला हा लादलेला प्रकल्प मागे घ्यावाच लागेल,असा इशाराही संघटना प्रमुखांनी दिला आहे.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प प्रलंबित असतानाच, नव्या खाजगी अणुऊर्जा प्रकल्पासाठी बारसूची निवड झाल्याच्या चर्चेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बारसू–सोलगाव रिफायनरी विरोधी आंदोलनातील यशानंतर आता बारसू परिसर पुन्हा एकदा मोठ्या जनआंदोलनाच्या उंबरठ्यावर उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.




