
राजिवडा खाडीमुखातील गाळामुळे मच्छीमार धोक्यात; नौका चार तास अडकली
रत्नागिरी शहरालगतच्या राजिवडा खाडीमुखातील वाढत्या गाळामुळे मच्छीमारांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. बुधवारी सकाळी पाण्याचा अचूक अंदाज न आल्याने राजिवड्यातील एक मच्छीमारी नौका खाडीमुखातील गाळात अडकली. भरती येईपर्यंत नौका हलू शकली नाही. अखेर दुपारच्या सुमारास समुद्रातील भरतीच्या लाटांमुळे नौका बाहेर निघाल्याने मच्छीमारांनी सुटकेचा निश्वास सोडला. जवळपास चार तास हे मच्छीमार जीव मुठीत घेऊन नौकेतच अडकून पडले होते.
राजिवडा खाडीतील गाळ काढण्यासाठी तब्बल १४३ कोटी ९६ लाख ८१ हजार ३५५ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांतर्गत खाडीमुखातील गाळ हटवून मच्छीमारांच्या सुरक्षित ये-जाीसाठी स्वतंत्र चॅनल तयार करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. मात्र पावसाळा तोंडावर आला असून विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे निधी उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.




