
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात
रत्नागिरी : शहराजवळील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे आज (१४ मे) रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते, तर ते एक आदर्श राजा आणि प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. आपल्या अफाट शौर्याने आणि पराक्रमाने त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षापर्यंत त्यांनी अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले होते आणि ‘बुधभूषण’ सारख्या ग्रंथाची निर्मिती करून आपल्या विद्वत्तेची चुणूक दाखवली होती. आपल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी तब्बल १२० लढाया केल्या आणि एकही लढाई ते हरले नाहीत, हे त्यांच्या अद्वितीय युद्धकौशल्याचे प्रतीक आहे. धर्माभिमान आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा यासाठी त्यांनी सोसलेले बलिदान आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहते. त्यांच्या पराक्रमाची कहाणी म्हणजे केवळ इतिहास नाही, तर ती एक ज्वलंत प्रेरणा आहे जी प्रत्येक पिढीला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देते. त्यांचे धैर्य, निडरपणा आणि निष्ठा आजही युवकांसाठी आदर्श मानले जातात.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.




