
भाजप पश्चिम मंडलाच्या ‘मन की बात’ संयोजकपदी विनायक कदम यांची नियुक्ती
राजापूर : भारतीय जनता पार्टी राजापूर पश्चिम मंडलाच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या संयोजकपदी विनायक कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहसंयोजकपदी आशिष मालवणकर यांची निवड करण्यात आली आहे.
विनायक कदम हे राजापूर तालुक्यातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक तसेच पक्ष संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पक्षातील त्यांची सातत्यपूर्ण धडपड, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि संघटन कौशल्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन आणि प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने विनायक कदम यांची तालुका संयोजकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर आशिष मालवणकर यांच्याकडे सहसंयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर भाजप कार्यकर्त्यांकडून विनायक कदम आणि आशिष मालवणकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ते कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




