“पुनर्वसनाशिवाय धरण नको”; जामदा धरणग्रस्तांचे साखळी उपोषण तीव्र


राजापूर तालुक्यातील काजर्डे येथे जामदा धरणग्रस्तांनी सुरू केलेले आंदोलन अधिक तीव्र होत असून “आधी पुनर्वसन, मग धरण” या मागणीसाठी ग्रामस्थांनी सलग तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. पुनर्वसनाबाबत शासन आणि प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका जाहीर होत नसल्याने धरणग्रस्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

जामदा धरण प्रकल्पाची अधिसूचना २००८ मध्ये जाहीर करण्यात आली होती. मात्र अनेक वर्षे उलटूनही बाधित क्षेत्रातील सर्वेक्षण, मोजणी आणि पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पुनर्वसनाचे ठिकाण, अटी, रोजगार, जमीन आणि मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने ठोस माहिती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पुनर्वसनाची लेखी हमी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार धरणग्रस्तांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, विधानसभा क्षेत्रप्रमुख अशोक सक्रे, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, विभागप्रमुख विलास नारकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

जामदा धरणग्रस्तांचा हा लढा पुनर्वसन आणि मूलभूत हक्कांसाठी असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button