
पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेला लाडघर परिसर अजूनही मुलभूत सुविधांपासून वंचित
पर्यटनाच्या नकाशावर झळकणारे, राज्य शासनाकडून ’पायलट प्रोजेक्ट’ म्हणून गौरवला गेलेला लाडघर परिसर आज मूलभूत सुविधांसाठी अक्षरशः हवालदिल झाल्याचे वास्तव समोर आले आहे. ब्ल्यू फ्लॅग करिता नामांकन मिळालेल्या या गावाला अंधाराचे ग्रहण लागल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून तसेच हॉटेल-रिसॉर्ट मालकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत येथील हॉटेल व्यावसायिकांनी महावितरणच्या अधिकार्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गावातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळूनही अखंड वीजपुरवठा देण्यात यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. वारंवार वीज खंडीत होणे, तासनतास चालणारे भारनियमन आणि त्यात भर म्हणून अखंड वीज पुरवठ्याचा शून्य दर्जा यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे हॉटेल्स, होमस्टे आणि इतर व्यवसायांमध्ये वातानुकुलिन सारख्या सुविधा आवश्यक झाल्या आहेत मात्र खंडीत वीज पुरवठ्यामुळे त्या देता येत नसल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
त्यातच कमी-अधिक दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान होत आहे. घरगुती वापरातील उपकरणापासून ते व्यावसायिक यंत्रसामग्रीपर्यंत सर्व उपकरणे धोक्यात आली आहेत. तरीही महावितरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप वाढत आहे. तात्पुरत्या उपाययोजनांच्या नावाखाली केलेल्या कामांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचेही समोर आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामस्थानी महावितरणचे कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकार्यांकडे निवेदन देत त्वरित ठोस कारवाईची मागणी केली आहे.
www.konkantoday.com




