दिल्ली-निझामुद्दीनकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला रविवारी पहाटे भीषण आग,प्रवाशांची धावपळ, दिल्ली-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत!


दिल्ली-निझामुद्दीनकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला रविवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. ही घटना भारतीय रेल्वेच्या कोटा रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या लुनीरिच्छा आणि विक्रमगड आलोट रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. आगीत ट्रेनचे दोन डबे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत, मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास ट्रेनच्या बी-1 डब्यातून अचानक आग लागल्याचे दिसले. डब्यातून धूर निघत असल्याचे पाहताच गार्डने अत्यंत तत्परता दाखवत तात्काळ लोको पायलटला याची माहिती दिली. लोको पायलटनेही गाडी तात्काळ थांबवली. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करत बी-1 डब्यातील सुमारे 68 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यांना इतर डब्यांमध्ये हलवले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. रतलाम रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मुकेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 5.20 वाजता कोटा कंट्रोलकडून रतलाम कंट्रोलला या आगीची माहिती मिळाली होती. अपघाताची माहिती मिळताच रतलाम येथून टॉवर वॅगनसह ॲक्सीडेंट रिलीफ ट्रेन तातडीने घटनास्थळासाठी रवाना करण्यात आली.

या भीषण आगीमुळे दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button