दापोली तालुक्यातील हर्णे येथे दोन युवकांना झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात तणाव ,रस्ता रोको ,पोलिसांचा हस्तक्षेप


दापोली तालुक्यातील हर्णे येथे दोन युवकांना झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात बुधवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. चिन्मय गुरव व रघुवीर या दोन युवकांना ४० ते ५० जणांच्या समूहाने घेरून अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हर्णे येथील किल्ला परिसरात काही युवक धूम्रपान व मद्यपान करत असल्याचे पाहून एका हिंदू युवकाने त्यांना हटकले होते. या घटनेचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी बुधवारी मोठा घोळका एकत्र येत चिन्मय गुरव व रघुवीर या दोघांवर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मारहाणीत दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एका युवकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. दुसऱ्या युवकालाही गंभीर दुखापत झाल्याने उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती परिसरात पसरताच दापोलीतील शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने रात्री दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमले. मारहाण करणाऱ्या युवकांना तात्काळ अटक करून कठोर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत दापोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे हर्णे व दापोली परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button