जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री होताच घेतले तीन धडाकेबाज निर्णय, एकही दिवस न थांबता काम करण्याचं आश्वासन!_____

टीव्हीके या पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठा करीश्मा दाखवत १०८ जागा जिंकल्या. तमिळनाडूमध्ये पन्नास वर्षांपासून असलेली डीएमके आणि एआयडीएमके या पक्षांना पर्याय म्हणून जोसेफ विजय यांचा टीव्हीके पक्ष उभा राहिला आहे. या पक्षाला बहुमत गाठता आलं नव्हतं. दरम्यान आता १२१ सदस्यांचा पाठिंबा असल्याचं पत्र विजय यांनी राज्यपालांना दिलं. ज्यानंतर तमिळनाडूच्या मुख्यमंत्री या पदावर जोसेफ विजय विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री होताच त्यांनी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

जोसेफ विजय यांनी कुठले तीन निर्णय घेतले?

२०० युनिट मोफत वीज : तमिळनाडूतील जनतेला मोठा दिलासा देत विजय यांनी राज्यातील प्रत्येक घरासाठी २०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याची घोषणा केली आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

अंमली पदार्थ विरोधी ‘स्पेशल टास्क फोर्स’: राज्यातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि ड्रग्स तस्करीचे कंबरडे मोडण्यासाठी एका विशेष कृती दलाचीस्थापना करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. ‘ड्रग-फ्री तमिळनाडू’ हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.

महिला सुरक्षेसाठी विशेष दल: राज्यातील महिलांची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि त्यांच्यावरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी आणखी एक स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना निर्भयपणे वावरता यावे, यासाठी हे दल काम करेल. मी पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात करेन असंही विजय यांनी जाहीर केलं आहे. ज्यानंतर त्यांनी हे धडाकेबाज निर्णय जाहीर केले आहेत.

तमिळनाडूत विजय पर्वाची सुरुवात

निवडणूक प्रचारादरम्यान विजय यांनी जनतेला शब्द दिला होता की, मुख्यमंत्री होताच मी वेळ वाया न घालवता कामाला सुरुवात करेन. आज शपथविधीनंतर त्यांनी आपल्या भाषणात या तीन निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांमुळे तमिळनाडूच्या राजकारणात आणि प्रशासनात ‘विजय’ पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. मोफत वीज आणि कडक सुरक्षा या दोन प्रमुख मुद्द्यांवर भर देऊन त्यांनी पहिल्याच दिवशी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.

तमिळनाडूत टीव्हीकेच्या रुपाने नवा पर्याय

तामिळनाडूमधील डीएमके आणि एआयएडीएमके या दोन पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आणू शकेल अशा पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा होत होती. या दोन पक्षांचे वर्चस्व संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक मोठ्या-मोठ्या दिग्गजांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा धुळीस मिळाल्या. इतकेच नाही तर राष्ट्रीय पक्षांनाही ते आतापर्यंत शक्य झालेले नाही.

कमल हासन, रजनीकांत यांना जे जमलं नाही ते विजय यांनी करुन दाखवलं

पण अखेर करीश्मा करून दाखवणारा कोणीतरी तामिळनाडूच्या राजकारणात अवतरला. थलपती विजयने आपल्या चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीला पूर्णविराम देऊन राजकारणात उडी घेतली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ‘तमिळगा वेत्री कळघम’ या त्याच्या पक्षाला १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. विजयने तीन मोठी आव्हनं थोपवत रजनीकांत, कमल हासन आणि विजयकांत यांना शक्य झालं नाही ते यशस्वीपणे करून दाखवले आहे. विजयच्या आधी चित्रपटसृष्टीतून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या नेत्यांपेक्षा विजयने वेगळी स्टॅटर्जी वापरल्याचे दिसून येते. रजनीकांत यांच्याप्रमाणे विजयने राजकारणात प्रवेश करण्यास अनाठाई वेळ लावला नाही. २०२४ मध्ये टीव्हीके स्थापना केल्यानंतर, विजयने तळागाळात संघटन वाढवण्यावर भर देण्यासाठी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, आणि त्यानंतर आपली सर्व शक्ती ही २०२६ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी झोकून दिली. २०२६ ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा अत्यंत धाडसी आणि जोखमीचा निर्णय विजयने घेतला.

एनटीआर यांच्या पावलावर विजय यांचं पाऊल

टीव्हीके पक्षाचे संस्थापक विजय आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते एनटीआर यांच्यात एक अनोखे साम्य दिसून आले आहे. तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) संस्थापक एन. टी. रामाराव (‘एनटीआर’ नावाने लोकप्रिय) यांच्यानंतर, स्वत:चा पक्ष स्थापन केल्याच्या दोन वर्षांच्या आत निवडणुकीत यश मिळवणारे विजय हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत.

विजय यांनी १९८४ मध्ये आपल्या वडिलांच्या (एस. ए. चंद्रशेखर) ‘वेत्री’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते.

१८ व्या वर्षी ‘नाळय तीरपू’ (१९९२) मधून मुख्य अभिनेता म्हणून त्यांनी पदार्पण केले. त्यांच्या दुसर्‍या चित्रपटात (सेंदूरपांडी, १९९३) ते विजयकांत यांच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत होते.

विजय यांनी तिसर्‍या चित्रपटापासूनच (रसिगन, १९९४) ‘इलय थलपती’ ही पदवी वापरण्यास सुरुवात केली. विजय यांनी ‘थलपती’वरून ‘थलायवन’ (नेता) आणि ‘मुथलवार’ असा प्रवास त्यांचा आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button