गोडी नदीपात्रात मेलेल्या कोंबड्यांची विल्हेवाट; नगरपरिषदेची तातडीने दंडात्मक कारवाई


राजापूर शहरातील गोडी नदीपात्रात मेलेल्या कोंबड्यांची घाण टाकून नदीचे पाणी दूषित केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. १० मे २०२६) रात्री उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती मिळताच राजापूर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गौस जमादार कोंबडीवाले यांनी मेलेल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी गोडी नदीपात्राचा वापर केल्याचे समोर आले. या प्रकारामुळे नदीचे पाणी दूषित होण्याबरोबरच परिसरात तीव्र दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची गंभीर दखल घेत राजापूर नगरपरिषद प्रशासनाने संबंधितांवर तातडीने दंडात्मक कारवाई केली. तसेच भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा पुन्हा आढळल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, राजापूर नगरपरिषदेकडून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे, नदीपात्र, नाले किंवा इतर परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, घाण अथवा मृत प्राण्यांची विल्हेवाट लावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button