
खेळातून उमललेली संवेदनशील पिढी
तळेकांटे येथे सुट्टीतील धमाल मनोरंजन शिबिराचा हृदयस्पर्शी अनुभव…
रत्नागिरी जिल्ह्यातील बावनदीजवळच्या तळेकांटे या डोंगरमाथ्यावर वसलेल्या छोट्याशा गावात दोन दिवस एक वेगळीच शाळा भरली होती. ही शाळा होती खेळांची, गाण्यांची, नाट्याची, संवादाची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विचारांची! जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी तसेच सुट्टीत गावी आलेल्या शहरातील चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले “सुट्टीतील धमाल मनोरंजन शिबिर” हे केवळ शिबिर नव्हते, तर मुलांच्या अंतरंगाला स्पर्श करणारा एक जिवंत अनुभव ठरला.
या शिबिराच्या आयोजनामध्ये गावातील तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, प्रशिक्षक राजेंद्र बहाळकर, संजय मोरे सर आणि ग्रामस्थ यांचा मोठा सहभाग होता. गावातील मुलांमध्ये दडलेली सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि शिकण्याची उर्मी अनुभवताना उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला.
शिबिराचे उद्घघाटनही वेगळ्या पद्धतीने झाले. भिंतीवर लावलेल्या एका पांढऱ्या कागदावर सरपंच सुषमा संदीप बने यांनी ब्रशने रंगाची एक रेघ ओढली. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आणि ग्रामस्थाने त्या कागदावर आपापल्या रंगाचा स्पर्श दिला. “कोऱ्या कॅनव्हासवर आयुष्याचे रंग भरायचे काम हे शिबिर करेल,” असा विश्वास प्रशिक्षक राजेंद्र बहाळकर यांनी व्यक्त केला आणि त्या क्षणापासून शिबिराने मुलांच्या मनात रंग भरायला सुरुवात केली.
पहिल्याच दिवशी मुलांना खेळातून विचार करायला शिकवले गेले. एका साध्या टॉवेलचे किती उपयोग होऊ शकतात, याचा खेळ घेतला गेला. कुणी त्याचा उशीसारखा उपयोग दाखवला, कुणी पाळणा, कुणी अंतरपाट, तर कुणी भांडी पुसण्याचे साधन. तब्बल पन्नास उपयोग मुलांनी शोधून काढले. या खेळातून मुलांची कल्पकता आणि सकारात्मक विचार करण्याची ताकद दिसून आली. गळफास लावण्यासाठी किंवा दुसऱ्याला इजा होईल असा कोणताही उपयोग या मुलांना सुचला नाही हे विशेष.
गटचर्चांमधून मुलांचे सामाजिक भानही प्रकर्षाने समोर आले. “आमचा त्रास घरी”, “आमचं काय चुकतं?”, “आपल्या पिढीची आकर्षणे”, “इच्छा आणि स्वप्ने” अशा विषयांवर चर्चा करताना मुलांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपले विचार मांडले. त्यांच्या बोलण्यातून आई-वडिलांबद्दलची करुणा, गरीबांविषयीची संवेदना आणि समाजाबद्दलची जाणीव स्पष्ट दिसत होती.
दुसऱ्या दिवशी मुलांचा उत्साह आणखी वाढलेला दिसला. सकाळी नऊची वेळ असतानाही अनेक मुले साडेआठलाच हॉलमध्ये येऊन बसली होती. शिकण्याची त्यांची आतुरता मनाला स्पर्शून जाणारी होती.
“थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला…” या गाण्याने दिवसाची सुरुवात झाली आणि नंतर सुरू झाले निरीक्षण, विवेक आणि विचारशक्ती विकसित करणारे खेळ. “काठी पडते” या खेळातून मुलांना आंधळेपणाने कोणाचाही प्रभाव स्वीकारू नये, प्रत्येक गोष्ट विवेकाच्या कसोटीवर तपासावी, हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला. क्रिकेटपटू, सिनेतारे, जाहिराती किंवा बाजारपेठ यांचा प्रभाव आपल्या विचारांवर कसा पडतो, याची जाणीव मुलांना करून देण्यात आली.
AI आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या जगात सर्जनशीलता, निरीक्षणशक्ती आणि कौशल्य किती महत्त्वाचे आहे, हेही मुलांना खेळातून समजावून सांगितले गेले. इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यासाठी वाचनाची गरज, स्वतः कथा तयार करण्याची मजा, सार्वजनिक बोलण्याचा सराव, नृत्य, गाणी, संवाद अशा अनेक उपक्रमांनी शिबिर जिवंत झाले.
विशेष म्हणजे, शिबिराच्या शेवटच्या सत्रात “आमचा त्रास घरीच” या चर्चेचा धागा पकडून मुलांना आई-वडिलांना पत्र लिहायला सांगितले गेले. आपल्या चुका मान्य करून पुन्हा त्रास देणार नाही, असे अनेक मुलांनी त्या पत्रात लिहिले. त्या निरागस भाषेतून उमटलेले प्रेम आणि अपराधीपण वाचताना अनेकांचे डोळे पाणावले. समारोपाच्या वेळी मुलांनी ही पत्रे स्वतःच्या आई-वडिलांच्या हातात दिली. त्या क्षणी शब्द नव्हते, पण भावनांचा पूर होता.
पहिल्या दिवशी बुजलेली, शांत बसलेली मुले समारोपाच्या वेळी आत्मविश्वासाने मनोगत व्यक्त करत होती. “प्रत्येक खेळातून काहीतरी शिकायला मिळाले,” असे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हेच या शिबिराचे खरे यश होते.
ग्रामीण भागातील मुलांची सांस्कृतिक भूक किती मोठी आहे, याची जाणीव या शिबिराने करून दिली. शहरातील लोकांनी वर्षातून किमान एकदा तरी गावात येऊन अशा मुलांशी संवाद साधावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि आत्मविश्वासाला हात द्यावा, ही गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली.
तळेकांटे येथे भरलेले हे शिबिर म्हणजे केवळ दोन दिवसांचा कार्यक्रम नव्हता; ती होती संवेदनशील, विचारशील आणि सर्जनशील पिढी घडवण्याची एक सुंदर सुरुवात.
———-====————-




