कोट्यावधी रुपयाची फसवणूक टीडब्ल्यूजे असोसिएट्स’चे संचालकदाम्पत्य जळगाव पोलिसांच्या ताब्यात


शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ‘टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि.’ (पुणे) या कंपनीच्या मुख्य संचालक दाम्पत्याला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील तब्बल २७९ गुंतवणूकदारांची २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या भामट्यांवर जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल ८ गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. समीर सुभाष नार्वेकर (वय ३५) आणि नेहा समीर नार्वेकर (वय ३६, दोघे रा. गिमवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. त्यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन जळगावात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुख्य संचालक समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, TWJ इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक संकेश रामकृष्ण धाग, जळगाव शाखेचा मॅनेजर मिलिंद शालिकराव पाटील आणि इतर एजंट यांनी संगनमत करून हा मोठा घोटाळा केला. त्यांनी विविध ठिकाणी सेमिनार आयोजित करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. शेअर मार्केट ट्रेडिंगची माहिती देऊन आणि सेबीच्या (SEBI) नियमांचे उघड उल्लंघन करून त्यांनी गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र, मुदत संपल्यानंतर परतावा न देता या रकमेचा अपहार करून गुंतवणूकदारांचा विश्वासघात केल्याप्रकरणी जळगावच्या पाळधी येथील भरत रतीलाल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता आणि अनियंत्रित ठेव आहे योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जळगावचा मिलिंद पाटील हा या कंपनीचा फ्रेंचाईसी म्हणून काम पाहत होता व त्याने कराराद्वारे गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून मोठे कमिशन लाटले होते. त्याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, मुख्य आरोपी समीर आणि नेहा नार्वेकर यांना ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात २९ जानेवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांचा ताबा घेतला आणि २६ मे रोजी रात्री त्यांना रीतसर अटक केली. सद्यस्थितीत पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्या मालमत्तेचा सखोल तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button