
१२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत; प्रलंबित व दाखलपूर्व वाद सामोपचाराने मिटवण्याचे आवाहन
*रत्नागिरी, दि ९ – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीतर्फे येत्या शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोकन्यायालया’चे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये विविध प्रकारची प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत.
- न्यायालयात प्रलंबित प्रकरणे: तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाउन्स (कलम १३८), दिवाणी वाद तसेच मामलेदार कोर्टातील प्रलंबित प्रकरणे.
- दाखलपूर्व (Pre-litigation) प्रकरणे: विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका व पतसंस्थांची थकीत कर्ज प्रकरणे, तसेच नगरपरिषद व ग्रामपंचायतींची थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे.
नागरिकांनी या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले वाद सामोपचाराने व विनाखर्च मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. श्री. व्ही. वाय. जाधव यांनी केले आहे.
पक्षकारांनी आपली प्रकरणे या लोकअदालतीत ठेवून तडजोड करण्यासाठी आपले संबंधित वकील, संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. आर. आर. पाटील यांनी दिली आहे.



