
आईने दिली किडनी, मुलाला मिळाले जीवदान; श्री गांगोबा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून उभारला १० लाखांचा निधी
खेड : बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अत्यंत हुशार विद्यार्थी कुमार प्रणय प्रवीण महापदी याला त्याच्या आईने स्वतःची किडनी दान करून नवजीवन दिले. तर या किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेला तब्बल १० लाख रुपयांचा निधी उभारून श्री गांगोबा प्रतिष्ठान, निवे खुर्द-माईनवाडी या संस्थेने महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य केले आहे. व समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे
गाव पोसरे खुर्द, पंधरा गाव, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील कुमार प्रणय प्रवीण महापदी हा बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याची किडनी निकामी झाल्याने त्याच्यावर तातडीने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले होते. अन्यथा त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते.
प्रणयला किडनी उपलब्ध करून देण्यापासून ते शस्त्रक्रियेपर्यंतचा एकूण खर्च अंदाजे १० ते १२ लाख रुपये होता. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने प्रणयचे वडील श्री. प्रवीण महापदी यांच्यासमोर एवढा मोठा खर्च उभा करण्याचे मोठे आव्हान होते. अनेक ठिकाणी मदतीची याचना करूनही अपेक्षित मदत मिळत नव्हती. त्यातच प्रणयची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्याने महापदी कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले होते.
अशा परिस्थितीत प्रणयच्या आई सौ. प्रणाली प्रवीण महापदी यांनी आपल्या पोटच्या मुलाला वाचविण्यासाठी स्वतःची किडनी दान करण्याचा धाडसी आणि भावनिक निर्णय घेतला. जणू आईने आपल्या मुलाला दुसऱ्यांदा जन्म दिल्याची भावना यावेळी सर्वांच्या मनात निर्माण झाली.
यानंतर प्रवीण महापदी यांनी श्री गांगोबा प्रतिष्ठानच्या सभासदांशी संपर्क साधला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णा माईन, सचिव विजय मनोहर माईन, व्यवस्थापक प्रकाश सोमा माईन व संजय सीताराम माईन, खजिनदार प्रदीप सापते तसेच सभासद वैभव माईन यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
या पदाधिकाऱ्यांनी अनेक व्यक्तींची भेट घेऊन प्रणयच्या उपचाराची संपूर्ण माहिती दिली आणि आर्थिक मदतीचे आवाहन केले. वैभव माईन आणि संस्थेच्या अध्यक्षांनी डॉक्टरांशी चर्चा करून पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही सहकार्य केले. संस्थेच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले आणि लोकसहभागातून तब्बल १० लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला. हा निधी प्रणयचे वडील श्री. प्रवीण महापदी यांच्या खात्यात सुपूर्द करण्यात आला.
त्यानंतर २६ ऑगस्ट २०२६ रोजी नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये प्रणयवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. उपचारानंतर त्याला ५ सप्टेंबर २०२६ रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
आपल्या मुलाला किडनी दान करून नवजीवन देणाऱ्या सौ. प्रणाली प्रवीण महापदी यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आईच्या त्यागामुळे प्रणयला जणू पुनर्जन्मच मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ८ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गांगोबा प्रतिष्ठानच्या सभासदांनी प्रणय, त्याची आई आणि संपूर्ण महापदी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांना धीर व दिलासा दिला.
यावेळी श्री गांगोबा प्रतिष्ठानचे आभार मानताना महापदी कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. “सध्याच्या काळात १० रुपयांची मदत करतानाही लोक अनेकदा विचार करतात; मात्र तुम्ही आमच्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची मदत उभी करून दिलीत. तुमचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही,” अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.
श्री गांगोबा प्रतिष्ठान, निवे खुर्द-माईनवाडी या संस्थेमार्फत यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. मार्च २०२६ मध्ये पाली, रायगड येथील पडसरे येथील आश्रमशाळेतील आदिवासी भागातील तब्बल ४०० विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले होते. या उपक्रमासाठी लोकसहभागातून संस्थेने सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचा खर्च केला होता.
श्री गांगोबा प्रतिष्ठानच्या या कार्यामुळे सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर एका होतकरू विद्यार्थ्याला नवजीवन मिळाल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.



