
कोकण रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम तीव्र; एप्रिलमध्ये ३७ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी आढळले
दंड आणि थकीत भाड्यातून ₹२.९० कोटींची वसुली; उन्हाळी गर्दीत तपासणी अधिक कडक होणार
कोकण रेल्वे प्रशासनाकडून (केआरसीएल) कडून एप्रिल २०२६ महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ३७ हजारांहून अधिक विनातिकीट तसेच अनियमित प्रवासी आढळून आले. या मोहिमेदरम्यान प्रवाशांकडून दंड आणि थकीत भाड्याच्या स्वरूपात तब्बल ₹२.९० कोटींची वसुली करण्यात आली.
कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात एकूण ९३४ विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. यामध्ये विनातिकीट प्रवास, चुकीच्या श्रेणीतील प्रवास तसेच अनियमित तिकिटांच्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.
तसेच, २०२५-२६ या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेकडून ११,३९४ विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या असून, त्यामध्ये ४ लाख ९९ हजार ६७५ अनधिकृत अथवा अनियमित प्रवाशांची प्रकरणे समोर आली आहेत. या कारवाईतून रेल्वेला एकूण ₹२७.६८ कोटींचा महसूल दंड व थकीत भाड्याच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.
दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने वैध तिकीटासह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी Railway Protection Force (RPF) आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहीम अधिक कडक करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.




