​ कोकणच्या बागायतदारांची क्रूर थट्टा थांबवा!​राजू शेट्टींचा आक्रमक इशारा; १५ मे नंतर ‘वर्षा’वर धडक


कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून सरकार त्यांची क्रूर थट्टा करत आहे. आता केवळ बैठका घेऊन वेळकाढूपणा करण्याचे दिवस संपले असून, सरकारचे डोळे उघडण्यासाठी ‘आरपारची लढाई’ लढली जाईल, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. शासनाने जाहीर केलेली २२ हजार रुपयांची मदत ही अत्यंत तुटपुंजी असून ती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. १५ मे पर्यंत ठोस निर्णय न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर धडक मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
​विम्याचे कवच नसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना सरकारने त्यांची थट्टा केली आहे. पंचनामे अद्याप समाधानकारक झालेले नाहीत आणि पालकमंत्री केवळ वल्गना करण्यात मग्न आहेत. “आज भीक मागितल्यासारखी मदत देऊन तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करत असाल, तर हा स्वाभिमानी कोकणी माणूस गप्प बसणार नाही,” अशा कडक शब्दांत शेट्टी यांनी आपला निषेध नोंदवला. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेने बागायतदार होरपळत असताना, दुसरीकडे औषध कंपन्या वसुलीसाठी त्यांच्या मागे तगादा लावत आहेत. हा प्रकार म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असून औषध कंपन्यांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. जर सरकारने यात वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर कंपन्यांची औषधे रस्त्यावर फेकून दिली जातील; मग सरकारने लष्कर लावले किंवा गुन्हे दाखल केले तरी आम्ही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
​बाजारपेठेत कर्नाटकी आंबा ‘हापूस’च्या नावाने विकला जात असल्याने कोकणच्या अस्सल हापूसची मोठी बदनामी होत आहे. प्रशासनाने हा बनाव रोखला नाही, तर परराज्यातील आंबा रस्त्यावर फेकून दिला जाईल, असा इशारा देतानाच वेळप्रसंगी कायदा हातात घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. कॅनिंग कारखानदारांनी संगनमताने दर पाडले असून हतबल शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांशी गाठ पडेल, असेही शेट्टी म्हणाले. १५ मे रोजी गिरगाव चौपाटीवर एकत्र जमून ‘वर्षा’च्या दिशेने कूच करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार बाळ माने, बावा साळवी, हेमंत माने, मयुरेश पाटील, प्रशांत साळुंखे आणि विजय देसाई यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button