
२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करणे आवश्यक – सुरेश प्रभू
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश प्रभू यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रात विविध आव्हाने असली तरी त्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या माध्यमातून ही क्षमता विकसित केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे १४ टक्के असून उर्वरित ८६ टक्के हिस्सा सेवा व उत्पादन क्षेत्राचा आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी पदवीधरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानामुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत असली तरी त्यामध्येच संधी शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतीमध्ये जितकी संकटे तितक्याच संधी” हा दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यापीठात ६५ टक्के विद्यार्थिनी शिक्षण घेत असून सुवर्णपदक विजेत्यांमध्येही मुलींचा मोठा सहभाग आहे. तसेच विद्यापीठाला ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
या समारंभात कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वनशास्त्र, उद्यानविद्या आणि मत्स्यशास्त्र अशा विविध शाखांतील डॉक्टरेट, पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध वर्षांतील सुवर्णपदके व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद करमरकर यांनी केले.




