हर्णे समुद्रकिनारी तस्करीच्या डिझेलची विक्री; रत्न माऊली’ बोटीसह दोघांना अटक


*रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्रकिनारी मासेमारी बोटींना तस्करीचे डिझेल विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा कस्टम विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ‘रत्न माऊली’ नावाची बोट जप्त करण्यात आली असून, बोटीचा मालक आणि तांडेल अशा दोघांनाही अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत या बोटीद्वारे तब्बल ३०० टनांहून अधिक डिझेलची अवैध विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, २१ एप्रिल २०२६ च्या रात्री पुणे कस्टम्सच्या दापोली विभागाचे अधीक्षक (P&I) श्री. अतुल व्ही. पोतदार यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने समुद्रात गस्त घातली. हर्णे किनारपट्टीपासून साधारण ११ नॉटिकल मैल अंतरावर ‘रत्न माऊली’ ही बोट संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. मध्यरात्रीच्या सुमारास ही बोट दुसऱ्या एका बोटीला डिझेल विकताना रंगेहाथ पकडण्यात आली. कस्टम्सच्या पथकाने तात्काळ दोन्ही बोटींना ताब्यात घेऊन दाभोल जेटीकडे वळवले. २२ एप्रिलच्या सकाळी ही बोट दाभोल येथे पोहोचल्यानंतर तिच्यातील डिझेलसह बोट जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या प्रकरणी विशेष सरकारी वकील श्री. शेखर डी. टोणपे यांनी आरोपींच्या अटकेसाठी दापोली न्यायालयात अर्ज सादर केला होता. माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा अर्ज मंजूर केल्यानंतर २४ एप्रिल २०२६ रोजी बोटीचा मालक आणि तांडेल या दोघांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या बोटीने गेल्या दोन महिन्यांत अनेक फेऱ्या मारून समुद्रामध्ये तस्करीच्या डिझेलची मोठी विक्री केली आहे. या कारवाईमुळे डिझेल माफियांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा अधिक तपास सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टम विभाग करत आहे.
समुद्रकिनारी किंवा परिसरात डिझेल तस्करीसारखे अवैध प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ कस्टम विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल.
संपर्क/व्हॉट्सॲप क्रमांक: ८७९६८९५९९० / ८४२११८८७५०.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button