
हजारो दिव्यांगांसाठी ‘आल्हाददायक’ बनलेली ‘आस्था’

“आई” हे जगातील सर्वात सुंदर रूप मानले जाते. जेव्हा एका आईसमोर आपल्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न उभा ठाकतो, तेव्हा ती अजिबात मागे राहत नाही. रत्नागिरीतील श्रीमती सुरेखा देवराव पाथरे यांचा प्रवास नेमका असाच आहे. आपल्या मुलाच्या ‘ऑटीझम’ या आव्हानाला त्यांनी केवळ स्वीकारले नाही, तर त्यालाच आपल्या आयुष्याचे ध्येय बनवून हजारो दिव्यांग मुलांच्या जीवनात प्रकाशाची किरणे पेरली. त्या किरणांमधून, जिद्दीतून उभी राहिली सुरेख ‘आस्था’

२००८ सालापर्यंत सुरेखा पाथरे जिल्हा परिषदेमध्ये शासकीय सेवेत कार्यरत होत्या. मात्र, मुलगा ‘आल्हाद’ याच्या ऑटीझमचे निदान झाले आणि एका आईच्या मनाची घालमेल सुरू झाली. आपल्या मुलाला आणि त्याच्यासारख्या इतर हजारो मुलांना समर्थपणे उभे करण्यासाठी त्यांनी २३ ऑक्टोबर २००८ रोजी शासकीय नोकरीचा त्याग केला आणि ‘आस्था सोशल फाउंडेशन’ची मुहूर्तमेढ रोवली.

केवळ संस्था स्थापन करून त्या थांबल्या नाहीत. तर या क्षेत्रातील बारकावे समजून घेण्यासाठी त्यांनी दिव्यांग क्षेत्रातील आवश्यक शिक्षणही पूर्ण केले. आज मागील १८ वर्षांपासून त्या निष्ठेने या क्षेत्रात ‘समाजसेवा’ नव्हे, तर ‘कर्तव्य’ म्हणून कार्यरत आहेत.

सुरेखा पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आस्था’ आज केवळ एक संस्था राहिली नसून ते दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाचे एक विद्यापीठ बनले आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती खालील १० महत्त्वाच्या प्रकल्पांतून दिसून येते:
लहान वयातच अपंगत्वाचे निदान करून त्यावर उपचार करणे.
विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शारीरिक व मानसिक उपचार.
मुलांना स्वावलंबी बनवणारे शिक्षण.
अडचणीच्या काळात तात्काळ मार्गदर्शन.
दिव्यांगांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक केंद्र.
दिव्यांगांच्या हक्कासाठी कायदेशीर लढा.
नोकरी आणि व्यवसायासाठी समुपदेशन.
गरजू दिव्यांगांना सहाय्यभूत साधने उपलब्ध करून देणे.
समाजाचा दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न.
फिरत्या केंद्राद्वारे ग्रामीण भागात श्रवण चाचणीची सुविधा.
एक समर्थ ‘मास्टर ट्रेनर’ आणि मार्गदर्शक
आज ही संस्था ‘जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र’ (DDRC) म्हणून ओळखली जाते. श्रीमती पाथरे यांचे कर्तृत्व केवळ संस्थेपुरते मर्यादित नाही. त्यांनी आमराई, स्पर्श, युनिसेफ, यशदा, उमेद आणि पाणी फाउंडेशन यांसारख्या नामवंत संस्थांसाठी ‘मास्टर सोशल ट्रेनर’ म्हणून काम केले आहे. जिल्हास्तरीय विविध समित्यांवर त्या सक्रिय सदस्य म्हणून प्रशासनालाही मोलाचे सहकार्य करत आहेत.
आपल्या दुःखाला कुरवाळत न बसता, त्या दुःखाचे रूपांतर शक्तीत कसे करावे, याचा आदर्श म्हणजे सुरेखा पाथरे. रत्नागिरीच्या ‘सुमंत कॉम्प्लेक्स’मधून सुरू झालेला हा ‘आस्थेचा’ प्रवास आज कोकणातील अनेक घरांमध्ये उमेद जागवत आहे. एका मुलाच्या ‘ऑटीझम’ने सुरू झालेला हा प्रवास आज हजारो दिव्यांगांना ‘आल्हाद’ (आनंद) मिळवून देत आहे.
संपर्क: श्रीमती सुरेखा देवराव पाथरे
आस्था सोशल फाउंडेशन, रत्नागिरी.
९४२१८१२७६६ / ९८३४४४०२००
– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती आधिकारी, रत्नागिरी




